लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कृत्रिम रेतनाद्वारे ९० टक्के मादी वासरेच जन्मास येतील, अशा लिंगविनिश्चित वीर्यामात्रा १८१ रुपये दराने दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासन देणार आहे. त्यातील शंभर रुपये ‘गोकूळ’ अनुदान देणार असल्याची माहीती ‘गोकूळ’चे ज्येेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी पत्रकातून दिली.
गोकूळमार्फत मादी वासरेच जन्मास येतील अशा लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यामात्रा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. पण त्याची किंमत अधिक असल्याने दूध उत्पादकांकडून त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अशा लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यामात्रा नाममात्र किमतीत शासनाकडून उपलब्ध व्हाव्यात, यासाठी दुग्ध विकास मंत्री सुनील केदार तसेच पशुसंवर्धन आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यास यश आले असून महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत सदरच्या लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यामात्रा उत्पादन व पुरवठा करण्याचे काम ‘जिनीस ब्रिडिंग इंडिया’ या संस्थेला देण्यात आले आहे. लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यामात्रा राज्यातील सहकारी व खाजगी दूध संघांना त्यांच्या दूध उत्पादकाकडील जनावरांना कृत्रिम रेतन करणेसाठी मागणीप्रमाणे १८१ रुपये प्रति वीर्यमात्रा या दराने उपलब्ध करण्यात येणार आहेत. यापैकी ‘गोकूळ’ १०० रुपये देणार असून सदरची लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यामात्रा दूध उत्पादकांना प्रतिवीर्यामात्रा ८१ रुपये या दराने उपलब्ध होणार आहेत. या लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यामात्रा गोकूळ दूध संघामार्फत लवकरच उपलब्ध होतील, असे अरुण डोंगळे यांनी सांगितले.