कोल्हापूर : प्रामाणिकपणे मतदान करून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी पक्ष बदलून आमच्या मताचा अनादर करत आहेत. ज्यासाठी त्यांना मत दिले त्या अपेक्षा ते विसरत आहेत. त्यामुळे येथून पुढे मताचा अधिकार वापरताना विचार तर करूच, पण जे अपेक्षाभंग करतील त्यांना याचा जाब विचारू. त्यांच्यासाठी आम्ही मतदान कार्ड विकणार नाही, असा निर्धार कोल्हापूर शहरातील सजग नागरिकांनी व्यक्त केला. देशासह राज्याच्या राजकारणात अनेक लोकप्रतिनिधी सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जात असल्याने आमच्या मताचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत आहे. काहींनी याविरोधात ‘ मतदान कार्ड विकणे आहे’ अशा पोस्ट सोशल मीडियावर केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सिटीझन्स सिंडीकेट संघटनेच्या वतीने 'मतदान कार्ड विकणार नाही' या विषयावर शाहू स्मारक भवनात बुधवारी महाचर्चा आयोजित केली होती. या चर्चेत अनेक नागरिकांनी सहभाग घेतला.अनंत मांडुकलीकर म्हणाले, सध्याची राजकीय परिस्थिती पाहून लोकशाहीने आपल्याला काय दिले, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. पण, मतदानाचे मूल्य खरे शस्त्र आहे. प्रत्येकाने ते आता विचार करून वापरणे गरजेचे आहे.डॉ. मानसिंग जगताप म्हणाले, मताचा अधिकार वापरून समस्येला वाचा फोडा. संपतराव चव्हाण-पाटील म्हणाले, पक्ष, नेता नव्हे, उमेदवार पाहूनच मतदान करा.जीवन बोडके म्हणाले, सध्याच्या परिस्थितीवर नागरिकांनी बोलायला हवे. आपले अधिकार योग्य ठिकाणी वापरायला हवेत. सारिका बकरे म्हणाल्या, आरक्षित जागा आहे म्हणून किंवा घरातील कुणीतरी सांगते म्हणून महिला निवडणूक लढवतात; पण त्यांचा हा निर्णय मताचा अनादर करतो.यावेळी माजी नगरसेविका भारती पोवार, प्रा. टी. के. सरगर, सुमलेश कांबळे, दिग्विजय गवळी, डॉ. रोहन चौधरी उपस्थित होते. अक्षय जहागीरदार यांनी सूत्रसंचालन केले. सोनाली देशमुख यांनी आभार मानले.
व्यवस्थेला जाब विचारणार, मतदान कार्ड नाही विकणार; कोल्हापुरातील सजग नागरिकांचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 11:58 AM