कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या कारकिर्दीतील पहिली सर्वसाधारण सभा मंगळवारी दुपारी १ वाजता राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. पदाधिकारी निवडीनंतर विविध समित्यांच्या १४ जागा रिक्त असून या ठिकाणी बिनविरोधी निवडी होण्याची शक्यता आहे.
सहा नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्यानंतर १४ जागा रिक्त झाल्या. त्यामुळेच ही निवड लागू नये यासाठी अध्यक्ष राहुल पाटील यांनी आज राष्ट्रवादी, राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पक्षप्रतोदांशी चर्चा केली. त्यानुसार युवराज पाटील, उमेश आपटे यांच्याशी चर्चा करून ‘ज्यांच्यामुळे जागा रिक्त झाली त्याच ठिकाणी जुन्या पदाधिकाऱ्यांना’ नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. अशा पद्धतीने ही निवडणूक बिनविरोध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचे वितरण, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या यावर या सभेत जोरदार चर्चा अपेक्षित आहे. या सभागृहाची मुदत संपण्यासाठी केवळ चार महिने शिल्लक असल्यामुळे आता प्रत्येकाला आपल्या मतदारसंघात मिळेल तेवढा निधी नेण्याचे उद्दिष्ट आहे.
चौकट
विरोधकांना दिलासा
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी वित्त आयोगाच्या निधी वितरणामध्ये विरोधकांना दिलासा देण्याची भूमिका घेतली आहे. निवडच बिनविरोध झाल्याने ही भूमिका घेण्याची त्यांची विनंती मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी मान्य केल्याचे समजते. त्यामुळे विरोधकांना समाधानकारक निधी देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे समजते.