:
तासाला २ हजार युनिटची होते विद्युत निर्मिती
सदाशिव मोरे
आजरा : आजरा तालुक्यातील चित्री मध्यम प्रकल्पातील पाण्यावर गेल्या १३ महिन्यांत ५३ लाख ७ हजार ४५२ विजेच्या युनिटची निर्मिती झाली आहे. आजरा तालुक्यातील शेती, पिण्याचे पाण्याबरोबर वीज निर्मितीतही चित्री प्रकल्प वरदान ठरला आहे. सन २०११ पासून गेली १० वर्षे चित्रीच्या पाण्यावर तासाला २ हजार युनिटची विद्युत निर्मिती सुरू आहे.
चित्री प्रकल्पात प्रतिवर्षी जुलैअखेर किंवा आॅगस्टमध्ये १०० टक्के क्षमतेने पाणीसाठा होतो.
गेल्या आठवड्यात चार दिवस पडलेल्या पावसाने चित्री प्रकल्प ६२ टक्के भरला आहे. तालुक्यातील एरंडोळ व धनगरवाडी हे लघुपाटबंधारे प्रकल्प भरले आहेत. चित्रीच्या पाण्यावर आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील ५८५० हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. तर अनेक गावच्या पिण्याच्या पाणी योजना चित्रीच्या पाण्यावर हिरण्यकेशी व चित्रा नदीवरून आहेत. चित्री धरण परिसरात जून ते सप्टेंबरअखेर ५० ते १५० मिलीमीटर इतका पाऊस पडतो.
चित्री प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सांडव्यातून व विद्युतगृहातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते. त्यामुळे चित्रा व हिरण्यकेशी नदीला पूर परिस्थिती निर्माण होते. विद्युतगृहातून सोडलेल्या पाण्यावर २०११ पासून तात्यासाहेब कोरे वारणानगर या कंपनीकडून विजेची निर्मिती केली जात आहे.
चित्री प्रकल्पातील पाण्याने आजरा गडहिंग्लज तालुक्यातील शेतजमिनीत हिरवे सोने पिकत आहेच. त्याबरोबर या पाण्यावर विद्युत निर्मितीही सुरू आहे. दररोज तासाला २ हजार युनिट वीज निर्मिती होते. विद्युत गृहातून पाणी सोडण्यापूर्वी वर्षभराचा पाणीसाठा याचे नियोजन केले जाते.
चित्रीचे पाणी गडहिंग्लज आज-यासह संकेश्वर व गोटूर बंधा-यापर्यंत सोडले जाते.
उन्हाळ्यात या भागातील नागरिकांची तहान चित्रीच्या पाण्याने भागविली जात आहे. चालू वर्षी लवकरच सुरू झालेल्या पावसाने चित्री धरणातील पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे यावर्षीही मोठ्या प्रमाणात विद्युत निर्मिती होणार आहे
चौकट :
चित्री प्रकल्पातून झालेली वीज निर्मिती युनिटमध्ये मे २०२० - ५ लाख ५७ हजार ६७१. जून २०२० - १ लाख ६१ हजार ५९०. जुलै २०२० - निरंक. आॅगष्ट २०२० - ९ लाख ३० हजार ७७८. सप्टेंबर २०२० - ७ लाख ८९ हजार ३९५. आॅक्टोबर २०२० - १ लाख ९१ हजार ५९२. नोव्हेंबर २०२० - १४ हजार ३०५. डिसेंबर २०२० - निरंक.
जानेवारी २०२१ - ४ हजार ७८७. फेब्रुवारी २०२१ - ९ लाख ८८ हजार ६८०. मार्च २०२१ - ७ लाख ६ हजार १४. एप्रिल २०२१ - ८ लाख ४१ हजार ५८०. मे २०२१ - १ लाख २१ हजार ६०. एकूण - ५३ लाख ७ हजार ४५२ युनिट.
दररोज तासाला २ हजार युनिटची निर्मिती
चित्रीच्या विद्युत गृहातून सोडल्या जाणा-या पाण्यावर तासाला २ हजार युनिटची निर्मिती केली जाते. जुलै व डिसेंबर २०२० या दोन महिन्यात विद्युत निर्मिती झालेली नाही. चित्रीवर तयार झालेली वीज आजरा सबस्टेशनमध्ये आणून ग्राहकांना वितरीत केली जाते.
फोटो ओळी : आजरा तालुक्यातील चित्री प्रकल्पात झालेला पाणीसाठा.
क्रमांक : २२०६२०२१-गड-०३