कोल्हापूर : माजी संरक्षणमंत्री आणि ज्येष्ठ नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे कोल्हापूरशी विशेषत: आजरा तालुक्याशी ऋणानुबंध होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याशी संबंधितांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.आजरा तालुक्यातील हाजगोळी बुद्रुक येथील जगदीश देशपांडे हे जॉर्ज फर्नांडिस यांचे सहकारी. रेल्वे युनियनचे ते काम पहात होते. बिहारमधील जॉर्ज यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचा नेहमी वावर असे. संरक्षणमंत्री असताना जगदीश यांच्या विनंतीनुसार १९९९ मध्ये जॉर्ज आजरा तालुक्यातील या खेडेगावामध्ये आले होते.सामान्य नागरिकाप्रमाणे जाजमावर बसून भाजी-भाकरीचा आस्वाद घेणाऱ्या या देशाच्या संरक्षणमंत्र्याचे असे दर्शन नागरिकांना नवीन होते. त्यामुळे जॉर्ज यांचा साधेपणाच यातून प्रतीत होत होता. घरातील सर्वांची आपुलकीने चौकशी करत, ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी या गावाला दिलेली भेट आजरा तालुक्याच्या लक्षात राहिली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील माजी आमदार स्व. शंकर धोंडी पाटील, जनता दलाचे रवी जाधव, शिवाजीराव परुळेकर, व्यंकाप्पा भोसले यांच्याशी त्यांचा संपर्क होता.