कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न राज्य सरकारने गांभीर्याने घ्यावा, पन्नास टक्क्यांत मराठा आरक्षण कसे बसू शकते, याची स्पष्टता समाजापुढे मांडून शासनाकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केले.येथील दसरा चौकात गुरुवारी अखिल भारतीय मराठा महासंघाचा भव्य चैत्र पाडवा महामेळावा झाला. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून कोंढरे बोलत होते. राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रारंभ कोंढरे यांचा महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे आणि एम.जी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक होते.यावेळी कोंढरे म्हणाले, कोल्हापूर हे जिवंत माणसांचे शहर आहे; परंतु ज्या शाहूनगरीत देशात झाले नव्हते, असे कायदे शाहूराजांनी केले, जिथे सर्वप्रथम रेल्वे, विमानसेवा, उद्योग, वसतिगृहे, कृषितंत्रज्ञान आणि आरक्षण आणले ते कोल्हापूर, जगात लय भारी खरंच आहे का याचे आत्मपरीक्षण करा, खोटा डंका वाजवू नका. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत कोल्हापूर बाराव्या क्रमांकावर आहे. इथल्या शेतकऱ्याच्या मुलाला कोल्हापुरात बारा हजार रुपयांच्या वर पगार मिळत नाही. पाचशे वर्षे शेतकऱ्यांच्या पूर्वजांनी ज्या जमिनी राखल्या त्या कवडीमोलाने विकू लागला आहे, ते थांबवा. कोल्हापूरचा मुळशी पॅटर्न करू नका, असे कळकळीचे आवाहन कोंढरे यांनी केले.वसंतराव मुळीक म्हणाले, आरक्षणासाठी मराठ्यांचा जरीपटका दिल्लीवर नेऊन फडकवण्याची वेळ आली आहे. तरुणांनी आता स्वत:च्या प्रश्नांसाठी स्वार्थ पाहिला पाहिजे. सारथी संस्था सक्षम केली पाहिजे, युवापिढीने लक्ष दिले पाहिजे, असे सांगून या महामेळाव्याचे लोण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचे आवाहन मुळीक यांनी केले.संजय जाधव यांनी शाहिरी कवन सादर केले. इंद्रजित माने यांनी स्वागत केले. यावेळी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव, तसेच अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, महिला अध्यक्ष शैलजा भोसले, श्रीकांत पाटील, शिवाजी पाटील, प्रा. शिवाजीराव भुकेले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उद्योजक व्ही.के. पाटील, राजू पाटील, अतुल पाटील, डॉ. दीपक पाटील, डॉ. संदीप पाटील यांच्यासह सातारा आणि सांगलीचे जिल्हाध्यक्ष, तसेच तालुकाध्यक्ष उपस्थित होते. उत्तम जाधव यांनी आभार मानले.