कोल्हापूर : शिक्षणमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथील मेन राजाराम शाळेचे स्थलांतर करण्याचे ठरवले आहे. शाहूविचारांना हा हरताळ फासणे असून त्यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक लाख ई-मेल पाठवण्याचा निर्णय मंगळवारी माजी विद्यार्थ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी नलवडे म्हणाले, या शाळेला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. शाळा वाचवण्यासाठी प्रसंगी रस्त्यावरच्या आंदोलनाची तयारी ठेवावी. वसंतराव मुळीक म्हणाले, केवळ आत्ताच नव्हे तर शाळेच्या विकासासाठीही सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. दिलीप देसाई यांनी विविध आंदोलनांची माहिती देऊन याच पद्धतीने ‘मेन राजाराम’चे आंदोलन लढण्याचे आवाहन केले.संभाजी ब्रिगेडचे रूपेश पाटील यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. ॲड. पडवळ, अष्टविनायक चव्हाण यांचीही यावेळी भाषणे झाली. पहिल्या मेळाव्यात भूमिका स्पष्ट करण्यासाठी पालकमंत्री केसरकर यांना १५ दिवसांचा कालावधी दिला आहे. तो आता संपत आला आहे. तरीही त्यांनी खुलासा केला नाही तर कोल्हापूरकर ठरवतील त्या पद्धतीने आंदोलनाचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. तोपर्यंत त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रह धरण्याचे निश्चित करण्यात आले.
दीपक केसरकरांचा राजीनामा घ्या, कोल्हापूरकर मुख्यमंत्र्यांना एक लाख ई-मेल पाठविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 3:28 PM