लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील वस्त्रोद्योग विविध कारणांमुळे अडचणीच्या आरिष्टात सापडला आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांकडून खरेदी केलेल्या ‘ग्रे’ कापडाची रक्कम ठरलेल्या मुदतीत द्यावी. परंतु कोणत्याही कारणास्तव रक्कम देण्यास उशिरा होत असल्यास तेवढ्या दिवसांचे व्याज त्या रकमेसोबत द्यावे, अशा मागणीचे निवेदन यंत्रमागधारक जागृती संघटनेच्यावतीने क्लॉथ अॅण्ड यार्न मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष उगमचंद गांधी यांना दिले. व्यापाऱ्यांना वेळेत पेमेंट देण्यास भाग पाडू, असे आश्वासन त्यांनी संघटनेला दिले.
निवेदनात, यंत्रमागावर उत्पादित होणारे ग्रे कापड व्यापाऱ्यांमार्फत देशाच्या विविध कापड बाजारांत विक्री केले जाते. त्यामुळे यंत्रमागधारक विश्वासाने व्यापाऱ्यांसोबत व्यवहार करतो. यंत्रमागधारक सध्या तोट्यात उद्योग करत असून, बँकांच्या कर्जाचे ओझे त्यांच्या डोक्यावर आहे. त्यात दिवसेंदिवस उत्पादन खर्चही वाढत आहे. अशा परिस्थितीत यंत्रमागधारकाला सुताचे पेमेंट देण्यास उशीर झाल्यास त्याला व्यापाऱ्यांना व्याज द्यावे लागते. त्यामुळे उद्योगच कोलमडून व्यापार बंद पडेल, अशी परिस्थिती येऊ नये, यासाठी प्रत्येकाने योग्य व्यापारनीतीचा अवलंब करावा. तसेच सर्व अडत व्यापाऱ्यांनी कापडाच्या उशिरा रकमेवरील व्याज मिळावे, याची त्वरित अंमलबजावणी करावी, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात अध्यक्ष विनय महाजन, सूरज दुबे, प्रवीण कदम, अशोक बुगड, सचिन मांगलेकर आदींचा समावेश होता.
फोटो ओळी
१५०६२०२१-आयसीएच-०१
कापडाच्या उशिरा रकमेवरील व्याज मिळावे, अशा मागणीचे निवेदन यंत्रमागधारक जागृती संघटनेने क्लॉथ अॅण्ड यार्न मर्चंटस् असोसिएशनला दिले.