कोल्हापूर :
कोल्हापूर शहराला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. आता तज्ज्ञांनी कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन वेळीच कडक उपाययोजना तसेच धोरणांची कडक अंमलबजावणी आतापासूनच करावी. याकरिता महापालिका प्रशासनाने सज्ज राहावे, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी मंगळवारी केली.
कोरोनाच्या आढावा बैठकीत जाधव बोलत होते. महापालिकेचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्ग अजून तीव्र आहे. कोल्हापूरला ‘रेड झोन’मधून ग्रीन झोनमध्ये आणण्याबरोबरच तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी आपणास करावी लागणार आहे. होम आयसोलेशन बंद करून, कोविड केअर सेंटर वाढवावी लागणार आहेत व सर्व रुग्णांना कोविड सेंटरमध्ये आयसोलेट करा, अशा स्पष्ट सूचना जाधव यांनी दिल्या.
लसीकरण ही महत्त्वाची उपचारपद्धती असल्याने लसीकरण केंद्र वाढवावीत. वयोवृद्ध, आजारी व अपंग यांना लसीकरणासाठी महापालिकेने वाहन उपलब्ध करून द्यावे. महापालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयामध्ये औषध साठा वेळीच उपलब्ध झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
-आपली मुले - आपली जबाबदारी-
कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे लहान मुलांसाठी बालरोगतज्ज्ञ तसेच संसर्गजन्य रोग तज्ज्ञांच्या उपलब्धतेसह अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज रुग्णालये व लसीकरण केंद्रे तयार करावीत तसेच ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’च्या धर्तीवर ‘आपली मुले-आपली जबाबदारी’ही या संकल्पनेवर जनजागृती करावी, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.
यावेळी उपायुक्त निखिल मोरे, प्रभारी शहर अभियंता नारायण भोसले, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, हर्षजित घाटगे, बाबूराव दबडे, आरोग्य अधिकारी डाॅ. पोळ, डाॅ. अशोक पोळ, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव आदी उपस्थित होते.
(फोटो देत आहे)