- पोपट पवार
कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्था हा सत्तेचा पाया आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या संस्थांमधील निवडणुकांना महत्त्व देत त्या जिंकण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिंदेसेनेचे पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना केले.
विरोधकांनी कितीही खोडा घातला तरी लाडकी बहीण योजना बंद करणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. सरवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथे शिंदेसेनेच्या वतीने आभार यात्रा सभेत ते बोलत होते. सभेला राधानगरीसह भुदरगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांतील लोकांची अलोट गर्दी उसळली. आरोग्यमंत्री व पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक, सत्यजित कदम, आदी प्रमुख उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्रिपदाच्या काळात राज्यातील विकासप्रकल्पांना चालना दिली. लोकाभिमुख योजना सुरू केल्या. त्यामुळे विधानसभेला जनतेने भरभरून आशीर्वाद दिले. अडीच वर्षांत मी साडेचारशे काेटी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला दिले. महाविकास आघाडीने अवघे अडीच कोटी दिले. आम्ही कोणत्या धर्माचा द्वेष करीत नाही. जो देशाच्या विरोधात आहे, त्याला विरोध करणार. मात्र, मातीशी इमान राखतील त्यांच्याबरोबर आम्ही आहोत.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी राज्याची सूत्रे हातात घेतल्यानंतर सर्वसामान्य माणसाला न्याय दिला. अनेक लोकांची टीका हाेत असतानाही त्यांनी कामांमधून उत्तर दिले. कोल्हापूर सर्किट बेंच, विमानतळ, अंबाबाई, जोतिबा विकास आराखडा याला गती देण्यासाठी आपले सहकार्य हवे.
जनतेच्या मनातील शिंदेच मुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न लपून राहिलेले नाही. खासदार धैर्यशील माने यांनी शिंदे हे रेकॉर्डवर उपमुख्यमंत्री आहेत, पण खऱ्या अर्थाने तेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असा उल्लेख केला. यावेळी मोबाइलचे टॉर्च लावून जनतेने शिंदे यांचे अभिनंदन केले.
तब्बल ८० जेसीबींतून फुलांची उधळण
एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी सरवडेतील रस्त्यावर तब्बल ८० जेसीबींतून फुलांची उधळण करण्यात आली. शिंदे यांचे सभास्थळी आगमन होण्यापूर्वी तब्बल १५ ते २० मिनिटे रस्त्यावर ही उधळण करण्यात आली. त्यामुळे गारगोटी-मुदाळ रस्त्यावर फुलांचा सडा पडला होता.
मंत्री आबिटकर यांचे नेटके नियोजन
पालकमंत्री आबिटकर हे सलग तिसऱ्यांदा राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांना थेट कॅबिनेटमंत्री करण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी तुम्ही प्रकाश यांना आमदार करा, मी नामदार करतो, असा शब्द देत तो पाळला. यामुळे सरवडेतील आभार यात्रेच्या सभेचे मंत्री आबिटकर यांनी अत्यंत नेटके नियोजन केले. त्यामुळे मतदारसंघातून अध्यक्षांनी करून दाखवले, अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली.