कोल्हापूर : आरक्षण आपला ह्क्क असून तो मिळविण्यासाठी मराठा समाजातील नेते, कार्यकर्त्यांनी गट-तट, पक्ष बाजूला ठेवून एकत्र यावे. आरक्षणाबाबत आपल्या भावना तीव्र असल्या, तरी समाजात वाद होणार नाहीत याची दक्षता घेवून संयम, एकजुटीने आंदोलन करून केंद्र, राज्य सरकारवर दबाव निर्माण करा, असे आवाहन शाहू छत्रपती यांनी गुरूवारी येथे केले.आरक्षणप्रश्नी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी येथील धैर्यप्रसाद हॉलमध्ये सकल मराठा समाजातर्फे आयोजित व्यापक मेळाव्यात ते बोलत होते. प्रत्येक राजकीय पक्षांतील मराठे सध्या वेगवेगळ्या दिशेने जात आहेत. त्यांनी मराठा आरक्षणासाठी एकत्र यावे.
इतरांचे आरक्षण कायम ठेवून आपल्याला पुढे जायचे असल्याचे लक्षात ठेवा. न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी केंद्र, राज्य सरकारने मराठा समाजाला पाठबळ द्यावे. घटनेतील बदलाबाबत राज्य, लोकसभेत निर्णय व्हावा. शिव-शाहूंनी दिलेला सर्वांना बरोबर घेवून पुढे जाण्याचा विचार घेवून लढा देवूया, असे आवाहन शाहू छत्रपती यांनी केले.