कोल्हापूर : कोल्हापूरची अंबाबाईही दिग्विजय करणारी, मातृसत्ताक राज्य राखणारी, जनतेचे रक्षण करणारी राणी आणि देवता आहे. हे क्षेत्र शाक्त आणि शैव सांप्रदायाचे असून, ही बहुजनांची देवता आहे. कोणत्याही पुराणग्रंथात ही देवी ‘विष्णुपत्नी लक्ष्मी’ असल्याचा उल्लेख नाही. उलट विष्णू हा अंबा भक्त असल्याचे पुरावे आहेत. या देवीचे ब्राह्मणीकरण करण्याचा कट केला जात असून, तिला लक्ष्मीच्या गौडबंगालातून आणि भुंग्याप्रमाणे बसलेल्या पुजाऱ्यांच्या तावडीतून मुक्त करूया, असे आवाहन प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केले. शाहू स्मारक भवनमध्ये मंगळवारी करवीरनिवासिनी अंबाबाई भक्त मंडळाच्यावतीने आयोजित ‘शोध अंबाबाईचा’ या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले. व्यासपीठावर मंडळाचे सहकार्यवाह वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, बबनराव रानगे उपस्थित होते. अत्यंत संवेदनशील असलेले हे व्याख्यान ऐकण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी सभागृह आणि बाहेरचा परिसर खचाखच भरलेला होता. कुंभार म्हणाले, पूर्वीच्या काळी स्त्री देवतांचे राज्य होते. अंबाबाईने रत्नागिरी ते अफगाणिस्तान, रत्नागिरी ते ओरिसा, रत्नागिरी ते वेल्लोर, रत्नागिरी ते कामाख्या असा दिग्विजय केला. ती स्त्री राज्याची देवता असल्याने शस्त्रधारी आहे. त्याचवेळी प्रजेचे, शेतीचे, पाण्याचे संरक्षण करणारी आहे. ‘अंबा’ हा शब्दच पाण्यापासून येतो. सतीचे नेत्र पडलेल्या या ठिकाणाला ‘अक्षतीर्थ’ म्हणतात. ती आदिशक्ती असल्याने तिची आराधना विष्णूने आणि पद्मावतीनेही केली. अंबाबाईच्या सहकार्यासाठी ‘कोल्हासूर’ नावाचा कोणताही असूर येथे नव्हता. ‘कोल्ला’ या शब्दाचा अर्थ तळ््यांचे गाव. अंबाबाईला सहकार्यासाठी विठ्ठलाई, निनाई अशा सात राण्या आल्या. जोतिबा, खंडोबा ही जकातीची स्थाने होती. देवीने दिग्विजय केले त्या सर्व ठिकाणी तिने देवराई निर्माण केली. आंबा घाटातून अंबाबाई कोल्हापुरात आली यावेळी तिला नागांनी सहकार्य केले म्हणून नागप्रतीकाचा आग्रह आहे. त्यानंतर या शहरात येणारे सगळे मार्ग कात्यायनी, टेंबलाई, हिंदलाजदेवी अशा स्त्री देवतांनी रोखले आहेत. शैव राजांचा पराभव केल्यानंतर हे क्षेत्र शाक्त ठाणे झाले; म्हणून या देवीच्या मंदिरात गणपती, कार्तिकेय, नवग्रह आहेत. ही लक्षणे कोणत्याही विष्णू मंदिरात नाहीत. शैव आणि आदिशक्ति स्थान असलेल्या अंबाबाईचे ब्राह्मणीकरण करण्याचा कट केला जात आहे. तो हाणून पाडण्यासाठी तिला आधी पुजाऱ्यांच्या तावडीतून मुक्त करा आणि डोळसपणाचे इतिहास पाहा, वाचा, जाणा. वसंतराव मुळीक यांनी देवीचा नवरा बदलून प्रसाद बदलणे, शालू स्वीकारणे अशा चुकीच्या प्रथा पाडल्या जात आहेत. नागचिन्हाच्या प्रकरणात आणि देवीचे रूप बदलणाऱ्या पुजाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे सांगितले. इंद्रजित सावंत यांनी पुजाऱ्यांना देवीच्या रूपाशी काही देणे-घेणे नाही. त्यांना केवळ गाभाऱ्यात येणारा पैसा महत्त्वाचा असल्याने व्यापारीकरण केले जात असल्याचे सांगितले. ‘दक्षायणी’चे ‘नारायणी’करणदेवीच्या ‘सर्वमंगल मांगल्ये, शिवे (म्हणजे शिवाची पत्नी), सर्वार्थ साधिके, शरण्ये, त्र्यंबके (यातील त्र्यंबक म्हणजेही शिव, गौरी म्हणजे सती, या तीन ठिकाणी शिवपत्नीचा उल्लेख होत असताना शेवटी ‘नारायणी’ हा शब्द कसा काय आला) त्यावर कुंभार यांनी हा शब्द ‘नारायणी’ नव्हे, तर ‘दक्षायणी नमोस्तुते:’ असल्याचे सांगितले. तिचे लक्ष्मीकरण करण्यासाठी ‘दक्षायणी’चे ‘नारायणी’करण करण्यात आले. कार्यक्रमातील ठराव अंबाबाई मूर्तीवर नाग त्वरित घडवावा नवरात्र वगळता स्थानिकांना दर्शनासाठी २ तास वेगळ्या रांगेची सोय करावीअंबाबाई चरणी येणारी सगळी दक्षिणा देवस्थानकडे जमा व्हावी व त्यातून भक्तांना सोयी पुरविण्यात याव्यात पंढरपूरप्रमाणे पूजेसाठी सर्वसमावेशक पुजाऱ्यांची नेमणूक व्हावी व तोपर्यंत सध्याच्या पुजाऱ्यांना आचारसंहिता लागू करावी
अंबाबाईला लक्ष्मीच्या गौडबंगालातून मुक्त करा
By admin | Published: October 07, 2015 12:49 AM