लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘काॅंग्रेस - राष्ट्रवादी काॅंग्रेस या पक्षांमध्ये कोणतीही स्पर्धा नाही. आम्ही जे ठरवलंय त्यात एक वाक्यही बदलणार नाही. त्यामुळे आमच्यात भांडणं लावण्यापेक्षा आधी तुमच्यातील वाद मिटवावेत’, असा सल्ला पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिला.
महानगरपालिकेच्या निवडणुकीत काॅंग्रेस व राष्ट्रवादीने समजूतदारपणे स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्व जागा लढविणार आहोत आणि निवडणुकीनंतर एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार आहोत. आमच्यात जागा जिंकण्याची कोणतीही स्पर्धा नाही. जे ठरलंय त्यात एक वाक्यही बदलणार नाही. त्यामुळे पुढची पाचच नाही तर दहा वर्षे आमचा संसार सुखाने होईल, यात शंका नाही, असे पालकमंत्री पाटील म्हणाले.
महाआघाडीत बिघाडी झाल्याचा बागुलबुवा भाजप - ताराराणी आघाडीचे कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे आमच्यात भांडणं लावण्यापेक्षा, गैरसमज निर्माण करण्यापेक्षा भाजप - ताराराणी आघाडीने आधी त्यांच्यातील मतभेद मिटवावेत. मूळ भाजप आणि सुजलेली भाजप असे दोन गट असून, त्यांच्यातच अंतर्गत गट आहेत, असे पालकमंत्री म्हणाले.
भाजपचे नेतृत्व धनंजय महाडिक करणार आहेत, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, महाडिक यांच्याकडे आता दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्यांनी तेथेच राहावे.
कळंबा उपकारागृह स्थलांतरचा प्रस्ताव
बिंदू चौकातील कळंबा उपकारागृह शहराच्या मध्यवस्तीत असून, त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे उपकारागृह कळंबा मध्यवर्ती कारागृहात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. कळंबा मध्यवर्ती कारागृह परिसरात सीसीटीव्ही व फ्लडलाईट लावण्यात येणार आहेत. यापुढे कारागृहात कोणत्या टोळीचे लोक साहित्य आत टाकताना सापडले तर त्या टोळीवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.