कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे शहरातील सर्वच उद्यानांची दोन दिवस नागरी गोंगाटापासून सुटका झाली. एरव्ही पहाटे साडेपाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत गजबजलेली उद्याने शनिवारी, रविवारी निर्मनुष्य होती. याठिकाणी फक्त विविध प्रजातीच्या पक्ष्यांचाच काय तो गोंगाट होता.
स्वच्छ हवा, प्रसन्न वातावरण आणि शुध्द ऑक्सिजन घेण्याकरिता आबालवृध्दांना उद्यानात जायला लागते. पहाटेच्या वेळी थंड हवेत फिरणे आणि आपले शरीर निरोगी ठेवण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. पहाटे आणि सायंकाळी असे दिवसातून दाेनवेळा उद्यानात फिरायला जाण्याचा तसेच आपल्या सहकाऱ्यांशी गप्पा मारण्याचा बहुसंख्य ज्येष्ठ नागरिकांचा शिरस्ता आहे. अनेकजण नेहमीच्या वातावरणातून तणावमुक्त होण्यासाठी विश्रांती म्हणून सहकुटुंब उद्यानात फिरायला जातात. परंतु, गेल्या दोन दिवसात सर्वांचाच दिनक्रम बदलला आहे.
लॉकडाऊनमुळे शहरातील सर्वच उद्याने बंद असल्याने नेहमीची वर्दळ दिसली नाही. उद्यानातून निरव शांतता दिसून आली. अधूनमधून विविध पक्ष्यांचे मंजूळ स्वर मात्र कानी पडत होते. उद्यानातील कर्मचारी आपली दैनंदिन कामे उरकताना, उद्यानाची झाडलोट, झाडांची देखभाल, पाणी घालण्याची कामे इमानेइतबारे पार पाडत असल्याचे दिसून आले. नेहमी प्रसन्न असणाऱ्या उद्यानातील वातावरणावर कोरोना संसर्गाचे सावट राहिल्यामुळे नागरी गोंगाटापासून उद्यानांची सुटका झाली.