कोल्हापूर- पोटठेकेदाराने पाणी योजनेचे काम न केल्याने कारभाराचा पंचनामा करून घेण्याची वेळ गुरूवारी जिल्हा परिषदेच्यापाणी पुरवठा विभागावर आली.
पट्टणकोडोली ता. हातकणंगले येथील पाणी योजना सहा वर्षे रखडल्याने ग्रामस्थांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी घागर मोर्चा काढून प्रवेशव्दारावरच ठिय्या मारला. पाच तासानंतरही आंदोलन मागे न घेतल्याने अखेर फेब्रूवारी २०२१ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.या गावासाठी २०१४ साली ५ कोटी ५३ लाखांची पेयजल योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र मुळ ठेकेदाराने पोटठेकेदार नेमला आणि त्यानंतर काम रखडले. सहा वर्षे झाली तरी काम अपूर्ण आहे. त्यामुळे संतापलेल्या पदाधिकारी, ग्रामस्थांनी दुपारी १२ वाजता घागर मोर्चा काढला.
मोर्चा प्रवेशव्दारावर अडवल्यानंतर सर्वांनीच रस्त्यावर ठिय्या मारला. उपसरपंच कृष्णाजी मसूरकर यांनी पाणी पुरवठा विभागाचे यावेळी पुरते वाभाडेच काढले.चर्चेसाठी कोणाकडेही येणार नाही असे मसूरकर यांनी स्पष्ट केल्यानंतर अखेर प्र. कार्यकारी अभियंता मनिष पवार हे मोर्चासमोर आले. यावेळी मसूरकर यांनी त्यांना विविध प्रश्न विचारून धारेवर धरले. मुळ काम तुम्ही दिला, त्यांनी पोटठेकेदार दिला. त्याने काम पूर्ण केले नाही.
उलट योजनेच्या दुरूस्तीसाठी आम्हांला साडे तीन लाख रूपये खर्च आला आहे. तुमचा एक अधिकारी त्याची एमबी मंजूर करत नाही म्हणून दुसऱ्या अधिकाऱ्याकडून ती मंजूर केली जाते. यात आम्हां ग्रामस्थांची काय चूक असा सवाल त्यांनी विचारला. यावेळी अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले. मात्र लेखी पत्राशिवाय हलणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्यामुळे मित्तल यांच्याशी संपर्क साधण्यात आला. तोपर्यंत आमदार राजीव आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे आले. अध्यक्ष बजरंग पाटील, सभापती प्रविण यादव, राजेश पाटील, विजय भोजे यांच्या उपस्थितीत चर्चा झाली आणि अखेर काम करण्याबाबत लेखी पत्र देण्यात आले.सरपंच विजया जाधव, सदस्य धुळा डावरे, सुर्यकांत भोजे, विमल चव्हाण, अश्विनी पिराई, खानदेव पिराई, बिरू कुशाप्पा, नंदकुमार माळी यांच्यासह सदस्य यावेळी उपस्थित होते.