कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेले मधुकर बापू वाघमारे (वय ६५, रा. हिम्मत बहाद्दूर एनक्लेव्ह, ताराबाई पार्क, कोल्हापूर) यांच्या बंगल्यात काम करणा-या घरगड्यानेच साडेसात लाखांच्या १५ तोळे दागिन्यांवर डल्ला मारला. ऑगस्ट ते डिसेंबर २०२३ दरम्यान हा प्रकार घडला.चोरीची शंका येताच वाघमारे यांनी बेडरुममध्ये छुपा सीसीटीव्ही कॅमेरा लावल्यामुळे चोरटा शुभम उर्फ साहील मनोज कांबळे (वय २४, रा. दत्त गल्ली, कसबा बावडा, कोल्हापूर) सापडला. कांबळे याला शनिवारी (दि. ६) अटक करून पोलिसांनी त्याच्याकडून पाच लाखांचे दहा तोळे दागिने हस्तगत केले.शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाघमारे हे हॉटेल व्यावसायिक आहेत. इतर नातेवाईक सोलापुरात राहत असल्यामुळे काही महिन्यांपासून ते हिम्मत बहाद्दूर परिसरातील बंगल्यात एकटेच राहतात. घरकाम आणि स्वयंपाकासाठी त्यांच्याकडे दोन तरुण येत होते. ऑगस्टपासून त्यांना बेडरुममधील कपाटातील दागिन्यांची संख्या कमी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकाराचा उलगडा करण्यासाठी त्यांनी बेडरुममध्ये छुपा कॅमेरा लावला. दोन दिवसांपूर्वी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर घरगडी शुभम कांबळे हाच कपाटातील दागिने लंपास करीत असल्याचे स्पष्ट झाले.
सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्यासह त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद देताच पोलिसांनी संशयित शुभम कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केले. सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, सहायक फौजदार संदीप जाधव, यांच्यासह पथकाने मुद्देमाल परत मिळविण्याचे काम केले.