इचलकरंजी : नगरपालिकेने बाजार शुल्क वसुलीचा ठेका खासगी मक्तेदाराला देण्याचा घाट घातला असून, त्याला शनिवारी लाल बावटा भाजीपाला फळविक्रेते व कापड व्यापारी संघटनेने मोर्चा काढून विरोध दर्शविला. बाजार शुल्क ठेका रद्द करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांच्याकडे करण्यात आली. इचलकरंजी नपाकडून सध्या कर्मचाऱ्यांमार्फत बाजार शुल्काची वसुली केली जाते. ही वसुली खासगी ठेकेदाराकडे देण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत. त्यासाठी टेंडरही प्रसिद्ध केले आहे. ही प्रक्रिया रद्द करून कर्मचाऱ्यांमार्फत मार्केटमध्ये भाजीपाला, फळ विक्रेत्यांकडून बाजार शुल्क आकारणी करावी, या मागणीसाठी लाल बावटा भाजीपाला फळ विक्रेते व कापड व्यापारी संघटना शनिवारी रस्त्यावर उतरली. कॉ. सदा मलाबादे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी नपावर मोर्चा काढला. यावेळी ठेका रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन नगराध्यक्षांना दिले. यावेळी चर्चेत सदा मलाबादेंनी खासगी मक्तेदाराकडे २०१५ साली ठेका दिला होता. मात्र, मक्तेदाराच्या मनमानी कारभारामुळे विक्रेत्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेकवेळा हाणामारीचेही प्रकार घडले. पालिकेने ठेका खासगी मक्तेदाराकडे देण्यासंदर्भात फेरीवाले कमिटीलाही विश्वासात घेणे गरजेचे होते. खासगी मक्तेदाराला ठेका देताना भाजीपाला फळ विक्रेते, आदी घटक वेगळे करावेत व त्यांची वसुली कर्मचाऱ्यांमार्फतच करावी, असे मत मांडून जबरदस्तीने ठेका दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. उपनगराध्यक्षा मोरबाळे यांनी बाजार वसुलीचा ठेका खासगी मक्तेदाराला देण्याचा पालिकेला अधिकार आहे. ठेका देण्यासंदर्भात फेरीवाले समितीलाही विश्वासात घेऊ असे आश्वासन दिले, तर यासंदर्भात फेरीवाले समितीची तातडीची बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा स्वामी यांनी दिली. आंदोलनात बजरंग डोईफोडे, अशोक गदगे, बंडा हिप्परगे, प्रकाश जाधव, अवसीन बागवान, आदींसह भाजीपाला, फळ विक्रेते, खोकीधारक सहभागी झाले होते. (वार्ताहर)
बाजार शुल्क वसुली ठेका ‘खासगी’ला देण्याचा घाट
By admin | Published: March 19, 2017 12:28 AM