इचलकरंजी : येथील सांगली रोडवरील एका मोठ्या मॉलची तब्बल ५५ लाख रुपयांची पाणीपट्टी व घरफाळा थकबाकी आहे. असे असतानाही बांधकाम खात्याची कोणतीही परवानगी न घेता पाणीपुरवठा विभागातील काही अधिकाऱ्यांनी तीन नवीन नळ जोडणी देण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी रस्ता उखडला असल्याची माहिती समजताच नगरसेवक इकबाल कलावंत यांच्यासह भागातील नागरिकांनी हे काम बंद पाडले.
शहरातील एका मोठ्या व्यावसायिकाने पालिकेची पाणीपट्टी व घरफाळापोटी ५५ लाख रुपयांची थकबाकी असताना पालिका अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून तीन नवीन जोडणी दिली जात आहे. त्यासाठी वर्षभरापूर्वीच केलेल्या सीईटीपी रिंगरोडवरील नवीन रस्त्याची खुदाई केल्याची माहिती मिळाल्यानंतर नगरसेवक कलावंत व भागातील नागरिक त्या ठिकाणी येऊन हे काम बंद पाडले. या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करावी; अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा दिला.