भाजप सरकारकडून आरक्षणाला धक्का लावण्याचा घाट : कॉँग्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 01:40 PM2020-03-07T13:40:57+5:302020-03-07T13:41:21+5:30
केंद्रातील भाजप सरकारकडून राज्यघटनेने मिळालेले ‘एससी,’ ‘एसटी’ व ‘ओबीसी’ आरक्षण रद्द करण्याचा घाट घातला जात आहे. हे चुकीचे असून, कॉँग्रेस या विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला.
कोल्हापूर : केंद्रातील भाजप सरकारकडून राज्यघटनेने मिळालेले ‘एससी,’ ‘एसटी’ व ‘ओबीसी’ आरक्षण रद्द करण्याचा घाट घातला जात आहे. हे चुकीचे असून, कॉँग्रेस या विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला.
शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार अनंत गुरव यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, नुकत्याच घडलेल्या काही घटनांवरून येणाऱ्या काळात भाजप सरकार व संघपरिवार ‘एससी’, ‘एसटी’ व ‘ओबीसी’ आरक्षण रद्द करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे.
भाजपप्रणित सरकारने वेळोवेळी न्यायालयात या आरक्षणाविरोधात भूमिका घेतली आहे. यामुळे मागास व उपेक्षित बहुजनांवर अन्याय होणार आहे. ही बाब भारतीय राज्यघटनेविरोधात असून ती अन्यायी आहे. जर आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला, तर याविरोधात कॉँग्रेस रस्त्यांवर उतरून आंदोलन करील.
शिष्टमंडळात जिल्हा सचिव संजय पोवार-वाईकर, संपतराव चव्हाण-पाटील, किशोर खानविलकर, दुर्वास कदम, बाबूराव कांबळे, चंदा बेलेकर, वैशाली महाडिक, लीला धुमाळ, डॉ. प्रमोद बुलबुले, साताप्पा कांबळे, रामचंद्र वाघमारे, आदींचा समावेश होता.