कोल्हापूर : ‘गोकूळ’ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे व आमदार प्रकाश आवाडे यांच्यात इचलकरंजी येथे खलबते झाली. ‘गोकूळ’सह जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ताकदीने उतरण्याचा निर्धार करत कोणा सोबत जायचे, याबाबत आगामी काळात निर्णय घेण्याचेही दोन्ही नेत्यांमध्ये ठरले आहे.
‘गोकूळ’च्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. सत्तारूढ गटाविरोधात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व खासदार संजय मंडलीक यांनी मोट बांधली आहे. भाजप हे सत्तारूढ गटासोबत राहणार हे निश्चित आहे. तरीही जिल्ह्याच्या राजकारणात मंत्री मुश्रीफ यांची कोंडी करण्यासाठी समरजीत घाटगे एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळेच त्यांनी शनिवारी आमदार आवाडे व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांची भेट घेतली. या नेत्यांमध्ये दीड तास खलबते झाली. जिल्ह्याच्या सहकारात आवाडे व राजे ग्रुपचे वेगळे स्थान आहे. ‘गोकूळ’ व जिल्हा बँक या जिल्ह्याच्या शिखर संस्थांमध्ये या नेत्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरू शकते. यासाठी नेमकी काय व्यूहरचना करायची, याची चाचपणी करण्यासाठी आवाडे व घाटगे यांच्यामध्ये चर्चा झाली.
कोट-
‘गोकूळ’सह जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काय भूमिका घ्यायची, कोणासोबत जायचे, यासह जागांबाबत बैठकीत चर्चा झाली. ही प्राथमिक चर्चा होती, लवकरच अंतिम भूमिका जाहीर करू.
- समरजीत घाटगे (जिल्हाध्यक्ष, भाजप)
फोटो - ‘गोकूळ’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी समरजीत घाटगे यांनी आमदार प्रकाश आवाडे व राहुल आवाडे यांची इचलकरंजी येथे जाऊन त्यांची भेट घेतली. (फोटो-१३०३२०२१-कोल-समरजीत)