लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शाहूवाडी ग्रामस्थांच्या साहाय्याने घाटगे ग्रुपचे तेज घाटगे आणि निवृत्त पोलीस उपअधीक्षक बाजीराव पाटील-पेरीडकर यांच्यातर्फे महानगरपालिकेच्या स्मशानभूमीकरिता लाकूड व शेणी मिळून दहा टन इंधन महानगरपालिकेचे उपायुक्त निखिल मोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी प्राणिल इंगळे, डॉ. विजय पाटील, कल्पना पाटील, सोहन घोडगिरे, राहुल भोसले उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यावर जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा तेव्हा घाटगे उद्योग समूहाने मदतीचा हात दिला. कोरोनाची पहिली लाट आल्यावर घाटगे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे तेज घाटगे यांच्या पुढाकाराने गरजूंना धान्य वाटप केले होते. त्याचबरोबर प्रशासनाला शववाहिकाही उपलब्ध करून दिली होती. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाकाळा येथे ४२ बेडचे सर्व सुविधांनीयुक्त कोविड केअर सेंटरही सुरू करण्यात आले होते. २०१९ च्या महापुरातही घाटगे ग्रुपने अनेकांना मदत केली होती.
सध्या कोरोना संकटात पुन्हा रुग्ण दगावण्याची संख्या वाढत आहे. याचाच ताण महानगरपालिकेवर येत आहे. महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीकडे शेणी आणि इतर साहित्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे दहा टन शेणी व लाकूड स्मशानभूमीस दिले.
गडहिंग्लजला शेणी...
घाटगे समूहातर्फे प्रत्येकी एक ट्रक शेणी गारगोटी व गडहिंग्लजला आज शनिवारी पाठवण्यात येणार असल्याचे तेज घाटगे यांनी सांगितले.
फोटो क्रमांक - १४०५२०२१-कोल-घाटगे ग्रुप
ओळ - कोल्हापुरातील घाटगे समूहातर्फे तेज घाटगे व निवृत्त पोलीस अधिकारी बाजीराव पाटील यांनी महानगरपालिका स्मशानभूमीसाठी दहा टन शेणी व लाकूड सुपूर्द करण्यात आले. यावेळी उपायुक्त निखिल मोरे, डॉ. विजय पाटील, अरविंद कांबळे उपस्थित होते.