कागल : मी अनेकांना झुलवत ठेवले, संस्थांची लूट केली, असे बोथट झालेले आरोप करणाऱ्या संजय घाटगेंनी समृद्धी दूध संघाचे काय केले? तेथे काम करणाऱ्या १०० तरुणांचे आयुष्य बरबाद कसे केले? याचे उत्तर जनतेला द्यावे, अशी टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.येथील डी. आर. माने महाविद्यालयात आयोजित ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. संस्थांसाठी अल्पभावात जमिनी घेऊन त्या जादा दराने विकून संजय घाटगेंनी कोट्यवधी रुपये मिळविले आहेत. त्यांनी या १०० कामगारांचे पुनर्वसन करावे, ही आपली विनंती आहे. अन्यथा आम्हाला त्या कामगारांना दत्तक घ्यावे लागेल. या मेळाव्याला युवराज पाटील, प्रवीणसिंह भोसले, शामराव पाटील, नेताजी मोरे, आदी प्रमुख उपस्थित होते.मुश्रीफ म्हणाले, समृद्धी दूध संघ कोणालातरी चौथ्यांदा पॅकेज घेऊन चालवायला दिला. त्यामुळे गेली १५ वर्षे काम करणारे १०० कामगार कमी केले. त्याच दिवशी संजय घाटगे माझ्यावर टीका करीत होते. आम्ही केडर आणि हमीदवाडा कारखान्यात जी मुले कमी केली त्यांचे सर्वप्रथम घोरपडे कारखान्यात पुनर्वसन केले. हा त्यांच्या आणि आमच्यातील फरक आहे. तुम्ही बाजार समितीत संजय मंडलिकांच्या की पी. एन. पाटील यांच्या पॅनेलला मतदान करणार हा प्रश्न केला होता. त्याला बगल देत माझ्यावर यापूर्वीच टीका करून उत्तर टाळले आहे. कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जेथे शक्य आहे तेथे स्वबळावर आणि शक्य नसेल तेथे समविचारी गटाबरोबर युती करावी.तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, भैया माने यांचेही भाषण झाले.कृष्ण आणि शकुनीमामा...आमदार मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात राजकीय महाभारत सुरू झाले की त्याची पात्रेही निश्चित होतात. कोण भीम, अर्जुन असतो. कागल तालुक्यालाही यातील काही पदे येतात. माझ्याकडे श्रीकृष्णाचे पात्र येते. त्यामुळे शकुनीमामाची भूमिका संजय घाटगेंना करावी लागते. ती चांगली पार पाडत आहेत.
घाटगेंनी ‘समृद्धी’चे वाटोळे केले
By admin | Published: June 29, 2015 12:18 AM