मराठी कवितेच्या प्रांतात ज्यांच्या सर्वच कवितांच्या ओळी अधोरेखित करण्याचा मोह रसिक वाचकांस होतो, असे कवी म्हणजे गझलसम्राट सुरेश भट. माणसाच्या प्रत्येक प्रहरास साद देणारी कविता म्हणून सुरेश भट यांची गाणी मराठी जिभेवर घोळत राहतात नि कानात त्यांचे गूज अन् गाज एकाचवेळी रुणझुणत, झणझणत राहतात. पहाटेला साखर झोपेची संज्ञा बहाल करणारी त्यांची कविता म्हणते, ‘पहाटे पहाटे मला जाग आली, तुझी रेशमाची गाठ सैल झाली’! सूर्याेदयपूर्व काळ भूपाळीचा मानण्यात येतो. तेव्हा हीच कविता ‘चल ऊठ रे मुकुंदा’ म्हणून साऱ्या आसमंताला जागे करते ती चांदण्यांच्या साक्षीने! सकाळ होताच ती ‘गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे!’ म्हणून प्रार्थना करू लागते. तीच कविता सूर्य डोक्यावर आला की गर्जू लागते. ‘नाही नाहत मला चांदणे, तळपे भानू डोईवरती... स्वत: पेटूनी पेटविणारा ज्वलंत मी तर एक निखारा’ म्हणत ग्वाही देऊ लागते. सूर्य अस्ताला जाताना ती ‘सूर्य केव्हाच अंधारला यार हो, या, नवा सूर्य आणू चला’ म्हणून आश्वस्त करते. रात्र होताच ती कविता प्रणयिनी बनून आर्जवू लागते. ‘मालवून टाक दीप, पेटवून अंग अंग...,’ नंतर कूस बदलून निद्रिस्त होणाऱ्या प्रियकरास ‘तरुण आहे रात्र अजूनी, राजसा निजलास का रे?’ म्हणून विचारणारी विराणी सुरेश भट यांचीच असते. जुन्या मैफिलीपासून ते झपाटलेल्या झंझावातापर्यंतच्या प्रत्येक प्रसंगाचे गीत गाणारे सुरेश भट, त्यांनी काय नाही लिहिलं? अभंग, भूपाळी, स्फूर्तिगीते, भावगीत, भाव कविता, गझल, हझल (वक्रोक्तीपूर्ण गझल), हायकू, लावणी, पोवाडा यांसह काही मुक्तकही! असे असले तरी त्यांच्या कवितेचा आत्मस्वर गझलच होता. हा तसा मूळ उर्दू काव्यप्रकार; पण भट यांनी कधी त्याची भ्रष्ट नक्कल केली नाही. उर्दू गझलेला त्यांनी मराठी शब्दमंत्राचा साज चढविला. गझल म्हणजे, शब्दांचा प्रमेय आणि अर्थाचा व्यत्यास! शब्द नि अर्थाचं अद्वैत हे तिचं सौंदर्य! अशा सुरेश भट यांचे चरित्र मराठीत नसावं हे कुणास सांगून खरे वाटणार नाही; पण ती एक वस्तुनिष्ठ नामुष्की होती खरी! सुरेश भट यांचे शिष्य प्रदीप निफाडकर यांनी गुरुदक्षिणेची उतराई करीत तिची भरपाई केली. ‘गझलसम्राट सुरेश भट आणि....’ असं अधुरं शीर्षक लाभलेलं हे चरित्र म्हणजे भट यांची बंडखोर, संयमी, धाडसी आणि तरल जीवनकहाणीच.हे पुस्तक रूढ अर्थाने चरित्र असले तरी तो व्यापक अर्थाने सुरेश भट यांच्या कवितेचा समीक्षा ग्रंथही बनला आहे. पण, त्यापेक्षा या ग्रंथात भट यांच्या आठवणींचा जो खजिना आहे, त्यास ज्वालामुखीच म्हणायला हवे. एकेक आठवण म्हणजे सुतळी बॉम्बचा स्फोटच! महाराष्ट्राने अनुभवलेले दोन ‘साहेब’ सुरेश भट यांची लेखणी लीलया पेलते. छगन भुजबळांनी शिवसेनेस रामराम ठोकल्यावर सुरेश भट जी हझल (गझल नव्हे!) लिहितात ती भर चौकात फ्लेक्सवर झळकते. मराठी कवितेला फ्लेक्सवर झळकविणारे एकमात्र कवी सुरेश भट! त्यांच्या कवितेस संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी चाली लावल्या. म्हणून ते बाळासाहेब ठाकरे यांच्या मर्जीतले मित्र! पण आपला हा मित्र घरी भेटायला येणार असे कळाल्यावर सूचकपणे हिरवी टोपी घालून बसणारे सुरेश भट! याच सुरेश भट यांचे गाणे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शाहीर अमर शेख यांनी आपल्या खड्या आवाजात गाऊन महाराष्ट्रभर पसरविले. आज महाराष्ट्र ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ म्हणत जे अभिमान गीत गातो आहे, ते गीत ३५६ गायकांनी मिळून गायिले. सुरेश भट यांच्या किती गीतांना हृदयनाथ मंगेशकरांनी चाली लावल्या नि ती गीते लता मंगेशकर, आशा भोसले यांनी गायिली. या सर्वांमागच्या या चरित्रातील हकिकत मुळातून वाचणे म्हणजे त्या काळाचे आपण साक्षीदार होणे. ही किमया करणारे चरित्रकार प्रदीप निफाडकर कच्च्या गुरूचे चेले नव्हेत, याची साक्ष चरित्रातील कितीतरी आठवणी देतात. चरित्रकार प्रदीप निफाडकरांनी कल्पकतेने दिलेले अर्धे शीर्षक पूर्ण करायचे म्हणून सांगेन की, सन १९८३-८५ च्या दरम्यान सुरेश भटांचे वास्तव्य काही कारणांमुळे कोल्हापुरात होते. भट यांना रिक्षातून फिरायचा छंद होता. रिक्षा नवी लागायची. रिक्षात टेपरेकॉर्डर असणे पूर्वअट होती. शिवाय त्यांनी निवडलेली रिक्षा मीटरवर न पळता दिवसाच्या ठरविलेल्या भाड्यावर चारी दिशा पळत राहायची. त्यांना खाण्या-पिण्याचा शौक होता. कोल्हापुरात ते साळोखेनगरमध्ये भाड्याने घर घेऊन राहिले होते. कळंबा जेलमध्ये त्यांचे जाणे-येणे घडले नि लक्षात आले की घरोघरी टी.व्ही. असताना जेलमध्ये मात्र अजून रेडिओचेच युग! त्यांनी तुरुंग प्रशासनास आॅफर दिली. मी एक संध्याकाळ तुमच्यासाठी गातो. झाले ‘रंग माझा वेगळा’ हा कार्यक्रम ठरला. तिकिटे छापली गेली. पोलिस, तुरुंग, महसूल, सीमाशुल्क, परिवहन साऱ्यांनी तिकिटे खपविली. मी वृत्तपत्रात लेख लिहिले. प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर ‘एक शाम, गझल के नाम’ साकारली. सर्व खर्च जाऊन कळंबा तुरुंगातील बंदीजनांना रंगीत टी.व्ही. मिळाला अन् महाराष्ट्रातील सर्व तुरुंगांत पुढे टी.व्ही.चे युग अवतरले. - डॉ. सुनीलकुमार लवटे
गझलसम्राट सुरेश भट आणि...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2017 11:59 PM