इचलकरंजी : गझलसाद संस्थेच्यावतीने आयोजित ऑनलाईन मुशायरा रंगतदार झाला. गझलकारांनी अस्वस्थ वर्तमान, इतिहास व भविष्याचा वेध घेणाऱ्या विविध रसांच्या गझला प्रभावीपणे सादर केल्या. मुशायऱ्यात डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी घरपण होते बेघर, भरल्या घरात शिरता विषवेली. सुखासुखी का कुठे जन्मते कविता व्यथेत भिजलेली? , अशी अस्वस्थ मनातून होणारी काव्यनिर्मितीची प्रक्रिया उलगडत मैफिलीची सुरुवात केली.
डॉ. संजीवनी तोफखाने यांनी, लढते अजून आहे माझीच मी लढाई. नाती किती जपावी पत्नी-बहीण-आई, असा स्त्री उद्गार मांडत स्त्रिची मानसिक-भावनिक आंदोलने स्पष्ट केली. प्रा. नरहर कुलकर्णी यांनी, जरा हसण्याने तिचे काय जाते? जरा लाजण्याने तिचे काय जाते?, अशी प्रेमळ तक्रार गझलेतून केली. सुधीर इनामदार यांनी, एक दिंडी रोजची कानीकपाळी नाचते आणि माझ्या आतमध्ये मांदियाळी नाचते, असे म्हणत शेकडो वर्षाच्या वारकरी सांप्रदायाचे तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न केला. डॉ. दयानंद काळे यांनी, कुणाच्यातलं म्हणून त्यांनी जाते? शोधली. कशी करावी माझ्यावरती मात शोधली, असे सांगत जाते? व्यवस्थेवर आणि तिच्यात दाहावर कोरडे ओढले. सारीका पाटील यांनी, मनाने लाघवी आहेस बहुदा. गझलला तू हवी आहेस बहुधा, असे म्हणत गझलशी असलेले नाते उलगडत नेले. अरुण देसाई यांनी, सुख-दु:खाला सदर म्हणू का?, आयुष्याला बखर म्हणू का, असा प्रश्न उभा करत मानवी भावभावनांचा व व्यवहारांचा धांडोळा घेतला. प्रा. डॉ. सुनंदा शेळके यांच्या गझलेतून असा फुलांचा सडा पडावा यावा दरवळ, आयुष्याची झडून जावी सारी मरगळ असा ऋतू बदलाचा आशादायी दरवळी गंध गझलेतून पसरवला.
संदीप पोवार यांनी, पगार-राशन-फरपट नाती यांनी तुटलो. वरून हसते बुद्धिमत्ता माझ्यावरती. ही सर्वसामान्य माणसाची आज होणारी ओढाताण मांडली. प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे यांनी, ओढ लागली रे आता नको दुरावा. ही भावना मनीची सांगून कोण गेले? अशी आर्त प्रेमभावना गझलेमधून मांडली. प्रसाद कुलकर्णी यांनी, वाहत येती गंगेमधूनी सामान्यांची प्रेते, मातेशीही कृतघ्न झाले सत्ता लंपट नेते, पीक घ्यायला नदीकाठही झाले आसुरलेला आहे; पण कोरोना शवे पुराया पुरेनात ही शेते असे दाहक गझलेतून मांडत मुशायºयाची सांगता केली. यावेळी अरुण वाडकर, राजश्री सूर्यवंशी, प्रा. केशर झावरे, आदी सहभागी झाले होते.