मिलिंद देशपांडे
दत्तवाड : शिरोळ तालुक्यातील दूधगंगा नदीकाठी असणाऱ्या घोसरवाड, टाकळीवाडी व जुने दानवाड पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली असून, घोसरवाड, टाकळीवाडी येथे परंपरागत विरोधक यांच्यात दुरंगी लढत होत आहे, तर जुने दानवाड येथे गत पंचवार्षिकप्रमाणेच बिनविरोध निवडणुकीची हॅट् ट्रिट् करण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे.
घोसरवाड (ता. शिरोळ) येथे ग्रामपंचायतीत परंपरागत शिंदे व खोत यांच्यात लढत होणार असली तरी माजी उपसभापती मानसिंग खोत व धरणग्रस्त नेते रामचंद्र लगड यांच्या निधनाने त्यांच्या गटात पोकळी निर्माण झाली आहे. गावात स्वाभिमानी़, शिवसेना-भाजप हे गटदेखील वर्चस्व सांभाळून असल्याने पॅनेल बनविताना नेत्यांना सर्वांचाच विचार करावा लागणार आहे. जुने दानवाड येथे हे मागील दोन ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या असून, यावेळीदेखील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे.
गुरुदत्त शुगर्सचे गाव म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध असणारे टाकळीवाडी येथे ग्रामसमृद्धी पॅनेल व महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार असून, ग्रामपंचायत सदस्य संख्या अकरा असली तरी एस.टी. प्रवर्गातील गावात कोणीच नसल्याने दहा जागेवरच निवडणूक होणार आहे. ग्रामपंचायतीसमोर बांधलेले दुकानगाळे, गावठाण हद्दीत झालेले अतिक्रमण या विषयावर येथील ग्रामपंचायत निवडणूक गाजण्याची शक्यता आहे.
...........
* एकूण प्रभाग व सदस्य संख्या - घोसरवाड (प्रभाग ५, सदस्य १५), जुने दानवाड (प्रभाग ३, सदस्य संख्या ९), टाकळीवाडी (प्रभाग ४, सदस्य ११) मतदार संख्या - घोसरवाड (५०४९), जुने दानवाड (१४५०), टाकळीवाडी (२४३०).