कोल्हापूर : फ्लॅटची बनावट कागदपत्रे तयार करून बांधकाम व्यावसायिक, फ्लॅटधारक व फायनान्स कंपनीचे तत्कालीन अधिकारी अशा ५१ जणांनी कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर येथील जीआयसी या फायनान्स कंपनीला ११ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे गुरुवारी उघड झाले.
सुमारे ३५ प्रकरणांत ही फसवणूक केल्याची माहिती आहे. यामध्ये कऱ्हाडसह कोल्हापूर व इचलकरंजी येथील संशयितांचा समावेश आहे. कंपनीचे शाखा व्यवस्थापक अमित विलास देसाई (वय ४०, रा. कऱ्हाड , जि. सातारा) यांनी बुधवारी (दि. २५) शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला.पोलिसांनी सांगितले,‘कऱ्हाड शहर आणि परिसरातील काही बांधकाम व्यावसायिकांनी २०१५ ते २०१७ या कालावधीत जीआयसी फायनान्स कंपनीकडे बांधकामांसाठी कर्जमागणी केली. त्यानुसार दाभोळकर कॉर्नर येथील शाखेतील कंपनीच्या तत्कालीन शाखाप्रमुख मीनू मोहन या महिलेने बांधकाम व्यावसायिक, फ्लॅटधारक, कंपनीतील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून बनावट कागदपत्रांवर कर्ज मंजूर केले; परंतु कर्जदारांकडून परतफेडीचे हप्ते थकले.फायनान्स कंपनीच्या नियमानुसार शाखा व्यवस्थापक मीनू मोहन यांची बदली झाली. त्यांच्या ठिकाणी नवीन शाखा व्यवस्थापक अमित देसाई रुजू झाले. यावेळी गेल्या तीन वर्षांत अनेक बांधकाम व्यावसायिकांचे कर्ज थकीत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी थकीत कर्जदारांची माहिती घेतली. यामध्ये मोठ्या फसवणुकीचा प्रकार समोर आला. यात बांधकाम व्यावसायिकांनी अनेक ठिकाणी फ्लॅटचे क्षेत्रफळ जास्त असल्याचे दाखवून जास्त कर्ज मंजूर करून घेतले. जागेवर नसलेल्या फ्लॅटवरही कर्जाची उचल केली.
प्रत्यक्षात सात कोटींच्या मालमत्तेवर १५ कोटींचे कर्ज दिले. थकीत कर्ज आणि खोट्या कागदपत्रांबाबत फायनान्स कंपनीने कर्जदारांना नोटिसा पाठविल्या. मात्र कर्जदारांकडून अपेक्षित खुलासा मिळाला नाही. बांधकाम व्यावसायिकांनी फ्लॅटधारकांच्या नावावर कर्ज घेतले असून, खोटी कागदपत्रे सादर केल्याचे यावेळी दिसून आले.त्यामुळे शाखा व्यवस्थापक देसाई यांनी बुधवारी (दि. २५)शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली.कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच कर्जदारांशी संगनमत केल्याने मोठी फसवणूक झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी हा तपास केला. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या सूचनेनुसार हा गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. यापुढील अधिक तपास पोलीस करीत आहेत.
असा झाला गैरव्यवहार
- फ्लॅटचे क्षेत्रफळ जास्त दाखवून कर्जाची उचल
- जागेवर नसलेल्या फ्लॅटवरही कर्ज
- ७ कोटींच्या मालमत्तेवर १५ कोटींचे कर्ज
फसवणुकीतील संशयीत असेसंतोष शंकर जांभळे, सर्जेराव भास्कर पाटील, शेखर शिवाजी मोरे, दयानंद मोहन चव्हाण, बाळकृष्ण दत्तात्रय मोरे, श्रीकांत नारायण माने, शीतल दयानंद चव्हाण, गीता आशिष थोरात, मंगल मधुकर जाधव, कल्पना प्रकाश आंबिके, राजाराम कृष्णा नलवडे, नाथा राजाराम पाटील, रामदास गोरखनाथ जाधव, श्रीकांत महादेवराव जाधव, अभयसिंह विठ्ठलराव भोसले, शंकर धोंडिबा चव्हाण, प्रभावती अरविंद कोळी, अभिजित राजेंद्र पाटील, हणमंतराव साहेबराव चव्हाण, अनुज वसंतराव पाटील, दीपक बाबूराव हिंदुले, पंकज बाजीराव थोरात, महेंद्रकुमार सावळाराम डुबल, बाबासो विलास जाधव, चंद्रकांत मुरलीधर कदम, तानाजी यशवंत माळी, चंद्रकांत जगन्नाथ शेलार, अनिल बाळासाहेब पाटील, हणमंत सदाशिव पाटील, अक्षयकुमार बाजीराव थोरात, संतोष रामचंद्र काशीद, तुषार पुंडलिक चोपडे, बाळासाहेब पंढरीनाथ माने, समृद्धी तुकाराम जाधव, कल्याणी सीताराम दिवेकर, सत्यनारायण देवकरण सैन (सर्व रा. कºहाड), तत्कालीन शाखा व्यवस्थापक मीनू मोहन, संजय खोत, योगेश आठले (सर्व रा. कोल्हापूर), देवेंद्र भुसकुटे, रा. पुणे, सेल्स एजंट शिवाजी भागवत वाघमारे, अख्तर रमजान मुल्ला (दोघे रा. प्रतिभानगर, कोल्हापूर), अभिजित अरुण कानिटकर, नंदा अनिल मेहेंदळे, हिदा दिलखुश तांबोळी, हिमांगी सुरेश शेणवी, वीरेंद्र सुरेश शेणवी, बशीर अमिरलाही फरास, आनंद वसंत ढेकणे, नईमअहमद इब्राहिम मुल्ला (सर्व रा. इचलकरंजी), आदींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.