जयसिंगपूर : यंदाचा ऊस गळीत हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यास परवानगी देऊ, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. याबाबतची मागणी सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, आदी भागांतील बहुसंख्य साखर कारखान्यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. राज्य सरकारच्या मंत्री समितीने चालू वर्षीचा ऊस गळीत हंगाम १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा घेतलेला निर्णय अव्यवहारी आहे. सन २०१४-१५ चा गाळप हंगाम थोडा उशिरा सुरू झाला तरी नोव्हेंबरमध्ये राज्यातील साखर कारखान्यांनी ११५ लाख टन उसाचे गाळप केले होते. मंत्री समितीच्या निर्णयाप्रमाणे डिसेंबरला गाळप हंगाम सुरू करायचे झाले तर जवळपास १३ ते १४ लाख टन साखर उशिरा उत्पादित होणार आहे. शेजारच्या कर्नाटक राज्याने १ नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रामध्ये यावर्षी साखर कारखान्यांना जवळपास ४५० लाख टन ऊस उपलब्ध होणार आहे. त्यापैकी सांगली, कोल्हापूर, सोलापूर व सातारा जिल्ह्यांमध्ये जवळपास २२५ लाख टन ऊस उपलब्ध होणार आहे. शिवाय उसाच्या तीव्र टंचाईमुळे महाराष्ट्रातील जवळपास १५ ते २० लाख टन ऊस कर्नाटकात जाण्याची शक्यता आहे. एकूणच या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील १५ ते २० वर्षांचा अनुभव पाहता शासनाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात साखर कारखान्यांना गाळप हंगाम सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनुकूलता दर्शवीत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्याची ग्वाही दिली. यावेळी राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार संजयकाका पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रशांत परिचारक, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, शेतकरी कृती समितीचे सतीश काकडे, आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांचा तोटा करून साखर कारखाने सुरू करू देणार नाही. सध्याचे बाजारपेठेतील साखरेचे दर पाहता यंदा एफआरपीपेक्षा जास्त रकमेची पहिली उचल आम्ही घेणारच आहे. त्याचा निर्णय जयसिंगपूर येथे २५ आॅक्टोबरला होणाऱ्या ऊस परिषदेमध्ये घेतला जाईल. मात्र, योग्य दर न मिळाल्यास सरकारने जरी कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली, तरीही स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या नेहमीच्या स्टाईलने रस्त्यावर उतरून साखर कारखाने बंद पाडेल.- राजू शेट्टी, खासदार
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गळितास परवानगी
By admin | Published: October 14, 2016 12:32 AM