इंदुमती गणेश ।कोल्हापूर : राष्ट्रीय स्पर्धेत पारितोषिक राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील दिगंत संभाजी पाटील यांनी राष्ट्रीय पातळीवरील इंग्रजी चित्रपट कथालेखन स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘गिल्ट’ या संहितेला १० लाखांचे पारितोषिक मिळाले आहे. यानिमित्त त्यांची ही चर्चेतील मुलाखत...
प्रश्न : आपली कौटुंबिक पार्श्वभूमी व या क्षेत्राविषयी आवड कशी निर्माण झाली?उत्तर : सरवडे हे माझ मूळ गाव असले तरी लहानपण साताऱ्यात गेले. आई-बाबा दोघेही साताºयात यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समध्ये प्रोफेसर होते. दोघांनाही वाचनाची खूप आवड असल्याने मला आणि बहिणीलाही याची गोडी लागली. बाबा उत्तम गायक असल्याने संगीताचं वातावरण होतं. मी तबलावादनदेखील शिकलो आहे. पुढे शिक्षणासाठी पुण्यात गेल्यानंतर फिल्म मेकिंगशी ओळख झाली. फिल्म मेकिंगमधील लेखनाची बाजू मला सर्वांत जवळची वाटली आणि मी त्याचा अभ्यास केला. दरम्यान, एम. एस्सी. करून आयआयटी, बॉम्बे येथे रिसर्च करू लागलो; पण चित्रपटांची आवड स्वस्थ बसू देईना. त्यामुळे मी ते क्षेत्र सोडून पूर्णवेळ लेखनाकडे वळालो.
प्रश्न: ‘गिल्ट’ संहितेबद्दल काय सांगाल?उत्तर : ‘आयआयटी’च्या दरम्यान कॅम्पसच्या आयुष्याची छाप माझ्यावर पडली होती. तसेच तणावामुळे विद्यार्थ्यांना येणारे डिप्रेशन आणि त्यांचे मानसिक स्वास्थ्याचे प्रश्न मी जवळून पाहिले होते. त्यामधूनच ‘गिल्ट’ या संहितेबद्दलचे विचार सुरू झाले. या कथेमध्ये एक आत्महत्या होते; पण आत्महत्येचं कारण स्पष्ट होत नाही. कथेमधील प्रत्येकाला संशय आहे की, तोच या आत्महत्येला जबाबदार आहे. प्रत्येकाच्या विविधांगी ‘गिल्ट’चा हा प्रवास आहे.
चित्रपट बघून नवे शिकायचा प्रयत्नतबलावादक उस्ताद झाकीर हुसेन म्हणतात, नेहमी एक चांगला विद्यार्थी बनायचा प्रयत्न करा! चित्रपट क्षेत्रात चांगला विद्यार्थी बनायचं असेल तर चांगले चित्रपट बघणे आणि त्यातून नवे शिकायचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
भविष्यात काय करायचे नियोजन आहे.?सध्या मी ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ या मालिकेचे संवादलेखन करीत आहे. तसेच एक इंग्रजी कादंबरीही लिहिली असून ती प्रकाशनाच्या वाटेवर आहे. चित्रपटांबद्दल शिकत राहणं आणि संहिता लिहीत राहणं हेच सध्याचं नियोजन आहे. लिहिलेली संहिता पडद्यावर येणं हे सर्वांत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीचे प्रयत्न कायमच असणार आहेत. माझी स्वत:ची या क्षेत्रात आत्ता कुठे सुरुवात आहे आणि अजून खूप गोष्टी शिकायच्या आहेत.