आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : मराठीतील नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा. या दिवशी पारंपारिक गिुढीसोबत साखरेच्या दागिन्यांचा प्रसाद म्हणून सजविण्याची पद्धत आहे. या सणाला साखरेच्या गाठींचे अनन्य साधारण असं महत्त्व आहे. साखरेंच्या गाठीशिवाय गुढी उभारलीच जात नाही. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील काही मिठाई व्यावसायिकांची परंपरेने साखरेच्या गाठी बनविणारी अनेक कुटुंबे होती.
गेल्या काही वर्षांत या गाठी तयार करणाऱ्यांच्या संख्येत घट होत आहे. या त्यांच्या वडिलोपार्जित व्यवसायाला आता घरघर लागली आहे. बाजारात या साखरेच्या गाठी उपलब्ध असून, नवीन वर्षाचे नवे संकल्प करण्यासाठी साखरेची गाठी बांधून गुढी उभारण्यासाठी गाठी खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी झाली आहे.
चैतन्याचा, नव संकल्प करण्याचा आणि संकल्प पूर्तीचा गुढीपाडवा हा सण. या सणानिमित्त साखरेच्या गाठींचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. त्यामुळे बदलत्या काळातही परंपरेने गाठी तयार करणारी कुटुंबे या सणाची चाहुल लागताच आपल्या उद्योगाला लागतात. विशेष करून ग्रामीण भागात साखरेचे दागिणे आणि गाठी तयार करणारी कुटुंबे आहेत. होळी आणि गुढीपाडवा या सणासाठी ही कुटुंबे या गाठी बनविण्याच्या कामात व्यस्त असतात. कित्येक पिढ्यांपासून साखरेचा गोडवा गुडीपाडवा आणि होळीला टिकून राहावा यासाठी ही कुटुंब या सणादिवशी व्यस्त असतात. गुढीपाडव्याला साखरेच्या गाठींची संपूर्ण राज्यभर मागणी असते. मात्र यावर्षी साखरेचे भाव वाढल्याने तसेच पारंपारिक गाठी बनविण्याचे उद्योग करण्याऐवजी अत्याधुनिक यंत्राद्वारे करण्याच्या पध्दतीमुळे या पारंपारिक व्यवसायाला काही अंशी घरघर लागलीय. पारंपरिक पद्धतीने लाकडी साच्यामध्ये बनवलेल्या गाठी आकर्षक असतात, परंतु कारखान्यामधून मशीनवर बनवलेल्या गाठी बाजारात दाखल झाल्या आहेत. सध्या साखरेच्या दरात वाढ झाल्याने गाठीचे दरही किलोमागे १० ते १५ रुपयांनी वाढलेले आहेत.गाठी बनविण्यासाठी प्रथम साखरेचा पाक तयार केला जातो. हा पाक घोटवून ज्या साईजमध्ये गाठी बनवायची आहे, त्या लाकडी साच्यामध्ये हा पाक ओतला जातो. वेगवेगळ्या साईजमध्ये व वेगवेगळ्या डिझाईन आणि वेगवेगळ्या वजनाच्या गाठी बनविण्यासाठी अनेक लाकडी साच्यांचा उपयोग केला जातो. १०० किलो साखरेमध्ये अंदाजे ९५ किलो गाठी तयार होतात. आमच्याकडे अजूनही हे लाकडी साचे आहेत, परंतु कालपरत्वे नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे.
- निखिल माळकर, कोल्हापूर.