लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : झाडपाल्याचे औषध देऊन मुलगाच होईल, असे सांगून गर्भवती महिलांची फसवणूक करणाऱ्या गिरगाव (ता. करवीर) येथील भोंदू वृद्धेचा पर्दाफाश ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी रविवारी केला. संशयित अनुबाई केरबा सरनाईक (वय ६०) असे तिचे नाव आहे. अधिक माहिती अशी, अनुबाई सरनाईक ही गेल्या दोन वर्षांपासून गर्भवती महिलांना झाडपाल्याचे औषध देऊन मुलगाच होईल, असे सांगून फसवणूक करीत असल्याची तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आली होती. समितीने खात्री केली असता, सरनाईक ही दीड महिन्याच्या गर्भवती महिलेस वडाच्या झाडाच्या फुलांच्या कळ्या व अंगारा खायला देत असे. मुलगाच होणार अशी बतावणी करून आर्थिक फसवणूक करीत असल्याचेही दिसून आले. समितीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी या वृद्धेच्या घरी जावून तिला ताब्यात घेत थेट करवीर पोलीस ठाण्यात आणले. तेथे सहायक पोलीस निरीक्षक छाया मंडले यांच्यासमोर तिने हात जोडून यापुढे असा प्रकार करणार नाही, कारवाई करू नका, अशी विनंती केली. तिने स्वत:हून चूक कबूल केल्याने ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी तक्रार मागे घेतली. पोलिसांनी तिचा लेखी जबाब घेऊन तिला सोडून दिले. याकामी स्वाती कोरे, सीमा पाटील, गीता हसूरकर, प्रकाश हिरेमठ, रमेश वडणगेकर, कृष्णात कोरे, कपिल मुळे यांचे सहकार्य लाभले.
गिरगावच्या भोंदू वृद्धेचा पर्दाफाश
By admin | Published: May 29, 2017 12:35 AM