कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहतीमध्ये प्रियकराबरोबर पळून जाऊन आंतरधर्मीय लग्न केलेल्या मुलीला तिच्या आई-वडिलांसह नातेवाइकांनी सासरच्या लोकांच्या डोळ्यात चटणीपूड टाकून पळवून नेले. ही घटना गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी, लक्षतीर्थ वसाहतीमध्ये राहणारा २३ वर्षांचा तरुण नोकरीनिमित्त पुण्याला गेला. याठिकाणीच तो पदवीचे शिक्षण घेत होता. नोकरी करत असताना त्याच ठिकाणी असलेल्या १९ वर्षांच्या तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. त्याची कुणकुण तिच्या आई-वडिलांना लागल्याने त्यांनी मुलीचा साखरपुडा उरकून टाकला. त्या नैराशेतून तरुणीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. परंतु, प्रियकराने तिची समजूत घालत तिला लग्न करायचे, असे सांगून नोकरीच्या ठिकाणाहून कोल्हापूरला आणले. याठिकाणी दोघांनी रजिस्टर लग्न केले. प्रियकराच्या आई-वडिलांचे तो लहान असतानाच निधन झाले आहे. त्याच्या काकांनी त्याला मोठा करून पुण्याला नोकरीसाठी पाठविले होते. त्यांच्याकडेच तो राहत आहे. गुरुवारी तो दुपारी कामानिमित्त बाहेर गेला होता. घरामध्ये काकी, त्यांची मुले व त्याची पत्नी होती. मुलीचे आई-वडील पुण्याहून थेट घरामध्ये घुसले. यावेळी त्यांनी घरातील लोकांना आम्ही मुलीला घेऊन जाण्यासाठी आलो आहे, असे सांगितले. त्यातून त्यांच्यात वादावादी झाली. यावेळी त्यांनी घरातील लोकांच्या डोळ्यात चटणीपूड टाकून मुलीला घेऊन ते गाडीतून निघून गेले. संबंधित मुलगा घरी आल्यानंतर तो कुटुंबासह लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आला. त्याने रजिस्टर लग्न केलेले प्रमाणपत्र पोलिसांना दाखविले. तसेच पत्नीला जबरदस्तीने पळवून नेल्याप्रकरणी तिच्या आई-वडिलांच्या विरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)
प्रियकराबरोबर आलेल्या मुलीस पळवले
By admin | Published: April 24, 2015 1:49 AM