कोल्हापूर : ५00 उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे तब्येत बिघडलेल्या कोल्हापूर जिल्हयातील भोतोली (ता. चंदगड) येथील शाळकरी मुलगी विजया निवृत्ती चौगुले हिला मुंबईमधील केईएम रुग्णालयात शुक्रवारी हलविण्यात आले.कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातून (सीपीआर) तिला दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. या मुलीचा सर्व वैद्यकिय खर्च महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील करणार असल्याची माहिती राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले. त्यामुळे या मुलीवरील सर्व वैद्यकिय चाचण्या आता मुंबईत होणार आहेत.सीपीआर रुग्णालयामध्ये सोमवारी (दि. ११) सायंकाळी उपचारासाठी या मुलीला आणण्यात आले. याठिकाणी तिचे सी.टी.स्कॅन, एमआरआय आणि सर्व शारिरीक तपासण्या करण्यात आल्या. पण, काही निदान झाले नाही. त्यामुळे न्युरो फिजिथेरपीस्ट डॉ. औरंगाबादकर यांनीही तपासणी केली. पण, कोणताही दोष आढळून आला नाही. त्यामुळे पुढील उपचाराकरिता मुंबईला हलविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
शुक्रवारी सकाळी कागदपत्रांची सर्व प्रक्रिया पूर्ण करुन दूपारी तिला रुग्णवाहिकेमधून मुंबईला नेण्यात आले. विजया चौगुले यांच्यासमवेत तिची आजी पार्वती चौगुले, वडिल निवृत्ती चौगुले व नातेवाईक गेले आहेत.
विजया चौगुले या मुलीचे निदान स्पष्ट झाले नाही. त्यामुळे तिच्यावर ‘व्हीडीओ-ईईजी’नुसार अत्याधुनिक पद्धतीने वैद्यकिय चाचण्या केईएम रुग्णालयामध्ये होणार आहे. याबाबत अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्याशी बोलणे झाले आहे.-डॉ. जयप्रकाश रामानंद,प्रभारी अधिष्ठाता, राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, कोल्हापूर.