कोल्हापूर : काटेभोगाव येथील ज्योती धनाजी सुतार यांना प्रसूतीकळा सुरू झाल्या. खुपिरे ग्रामीण रुग्णालयात त्यांना नेण्यात आले; परंतु प्रसूतीतील अडचणी असल्यामुळे नातेवाइकांनी त्यांना कोल्हापूरला नेण्याचा निर्णय घेतला. नावेची सोय करण्यात आली; परंतु अखेर पुराचा धोका न पत्करता पुन्हा खुपिरे येथेच त्यांना आणण्यात आले आणि तेथील वैद्यकीय पथकाने अतिशय अडचणीची असलेली ही प्रसूती शनिवारी सकाळी पार पाडली. बाळ-बाळंतीण सुखरूप आहेत, असा निरोप नातेवाइकांनी ऐकला आणि सर्वच डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांसमोर त्यांनी हात जोडले.
काटेभोगाव ते कळे, मग पुराच्या पाण्यातून खुपिरे असा हा प्रवास झाल्यानंतर बाळाचे वजन कमी असल्यामुळे नातेवाइकांची घालमेल सुरू झाली; परंतु पुन्हा पुरातून कोल्हापूरला जाण्याऐवजी खुपिरे ग्रामीण रुग्णालयातच प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला. खुपिरेला असलेला पुराच्या पाण्याचा वेढा, खंडित झालेला वीजपुरवठा, येथील स्त्रीरोगतज्ज्ञ कोविडने आजारी असल्याने उपलब्ध मनुष्यबळाचा लागणारा कस आणि नातेवाइकांच्या मनातील भीती अशा वातावरणामध्ये ही प्रसूती करण्याचे आव्हान स्वीकारले गेले.
सातत्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे हे या वैद्यकीय पथकाला मोबाइलवरून सूचना देत होते. शुक्रवारची रात्र सर्वांनी जागून काढली आणि शनिवारी सकाळी दहा वाजता ज्योती यांनी कन्यारत्नाला जन्म दिला. खासगी बालरोगतज्ज्ञ डॉ. मनीषा पोवाळकर यांचीही याकामी मदत झाली. या सर्व प्रक्रियेमध्ये वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सरिता थोरात, डॉ. मनोज माने, डॉ विठ्ठल पाटील, आनंदी थोरात, स्मिता होळकर, एम. बी. कांबळे, नितीन कांबळे, विनोद भारुडा, स्वच्छता कर्मचारी श्रीमती पाटील आणि माने यांनी योगदान दिले आणि नातेवाइकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.