गडहिंग्लज : भरधाव जाणार्या ट्रॅव्हल बसने स्प्लेंडर दुचाकीला उडवल्यामुळे दुचाकीवरील रेखा शंकर कुरुणकर (वय ४५) ही महिला जागीच ठार झाली, तर तिचा दुचाकीचालक मुलगा अमर (१८, रा. कडगाव, ता. गडहिंग्लज) व दुचाकीवर मागे बसलेली तिची विवाहित मुलगी अपर्णा विजय मस्कर (२१, रा. हसूर, ता. कागल) हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रॅव्हल बस पेटवून दिली. गारगोटी-गडहिंग्लज मार्गावर कडगावनजीक जखेवाडी फाट्यावर आज, बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कडगाव येथील कुरुणकर यांचे घर जखेवाडी रोडवर आहे. मोठ्या मुलीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा बाजारासाठी रेखा व अपर्णा या दोघीही अमरच्या दुचाकी (एमएच ०९ एवाय ३३९०)वरून गावात येत होत्या. दरम्यान, गारगोटीहून गडहिंग्लजकडे भरधाव येणार्या स्वामी ट्रॅव्हल्सच्या (एमएच ०४ एफके १८८३) या बसने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिल्यामुळे पाठीमागे बसलेल्या रेखा डांबरी रस्त्यावर आपटल्या. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी बसखाली अडकून फरफटत गेल्यामुळे अमर व अपर्णा यांच्या डोक्याला, चेहर्याला व हाता-पायांना गंभीर दुखापत झाली. अपर्णा हिच्यावर कोल्हापूर येथे, तर अमर याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आग विझविण्यासाठी गडहिंग्लज नगरपालिकेची अग्निशामक गाडी बोलावण्यात आली. मात्र, अग्निशामक नादुरुस्त असल्यामुळे उपलब्ध झाले नाही. त्यामुळे गावकर्यांनी गडहिंग्लजहून खासगी टँकर मागवला. मात्र, तो टँकरदेखील नादुरुस्तच असल्यामुळे धक्के मारतच त्यालाही घटनास्थळी नेऊन आग विझविण्याचा केविलवाणा प्रयत्न ग्रामस्थांनी केला. दहाच्या सुमारास संकेश्वर येथून कर्नाटक सरकारची अद्ययावत अग्निशामक गाडी व पथक आले. तोपर्यंत ट्रॅव्हलचा कोळसा झाला होता. घटनास्थळी डीवायएसपी अशोक भरते, तहसीलदार हनुमंत पाटील यांनी भेट दिली. अमरच्या फिर्यादीवरून अपघाताची पोलिसांत नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक रामदास इंगवले अधिक तपास करीत आहेत. गतिरोधक नसल्यामुळेच अपघात कडगाव गावाबाहेरून काढण्यात आलेल्या बायपास रस्त्यावरून ट्रॅव्हलसह बहुतेक वाहने भरधाव असतात. जखेवाडी फाट्यावरच गेल्यावर्षी कडगावच्या दत्ता पाटील यांची ट्रॅक्स ट्रॅव्हलने उडवली होती. पाच-सहा दुचाकीस्वारांनाही ट्रॅव्हलने याच पद्धतीने उडवले. मात्र, सुदैवाने त्यावेळी जीवितहानी झाली नव्हती. आजच्या घटनेत शेतमजूर महिला जागीच ठार झाल्यामुळे जमावाच्या संतापाचा उद्रेक झाला. जखेवाडी-कडगाव आणि उत्तूर-गडहिंग्लज या मार्गावरील जखेवाडी फाट्यावर गतिरोधक नसल्यामुळेच वारंवार अपघात होतात, अशी चर्चा घटनास्थळी होती. महागावच्या घटनेची आठवण वर्षापूर्वी गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील हुनगिनहाळनजीक रस्त्यालगतच्या विहिरीत ट्रॅव्हल बस कोसळून चालक आणि वाहकाचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यानंतर गडहिंग्लज कारखान्यासमोर चंदगड आगाराच्या बसने महागावच्या दुचाकीस्वार तरुणाचा बळी घेतला. त्यावेळीही संतप्त जमावाने बस पेटवली होती. त्या घटनेची आज पुन्हा आठवण झाली. (प्रतिनिधी)
बसच्या धडकेने महिला ठार मुलगा-मुलगी गंभीर
By admin | Published: May 29, 2014 1:24 AM