कोल्हापूर : रविनाच्या तीन, तर रजनीबालाच्या दोन गोलच्या जोरावर ‘हरियाणा फुटबॉल असोसिएशन’ने ‘अरुणाचल फुटबॉल असोसिएशन’चा ८-० असा दणदणीत पराभव करीत, हिरो चषक कनिष्ठ मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली. अन्य सामन्यांत ‘उत्तरप्रदेश फुटबॉल असोसिएशन’, ‘दिल्ली सॉकर असोसिएशन’, ‘इंडियन फुटबॉल असोसिएशन’, ‘मणिपूर फुटबॉल असोसिएशन’ यांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करीत पुढील फेरीत प्रवेश केला.शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत बुधवारी सकाळी झालेल्या पहिल्या सामन्यात ‘हरियाणा फुटबॉल असोसिएशन’ने ‘अरुणाचल प्रदेश फुटबॉल असोसिएशन’चा ८-० असा पराभव केला. यात रविनाने तीन, तर रजनीबाला हिने दोन, रितू, शीतल यांनी प्रत्येकी एका गोलची नोंद केली.
दुसऱ्या सामन्यात ‘उत्तरप्रदेश फुटबॉल असोसिएशन’ने ‘जम्मू आणि काश्मीर फुटबॉल असोसिएशन’चा ६-० असा पराभव केला. यात अंकिता पोतदार हिने दोन, तर नेहा कुमारी, उर्वशी शिकरवार, श्वेता केसी व एका स्वयंगोलची नोंद झाली. तिसऱ्या सामन्यांत ‘मणिपूर फुटबॉल असोसिएशन’ने ‘त्रिपुरा फुटबॉल असोसिएशन’चा २-० असा पराभव केला. यात मणिपूरकडून नागमिकापाम, एस. लिंडाकोम यांनी प्रत्येकी एका गोलची नोंद केली.पोलो मैदान येथे झालेल्या सामन्यात ‘इंडियन फुटबॉल असोसिएशन’ने ‘कर्नाटक फुटबॉल असोसिएशन’चा ४-१ असा पराभव केला. यात इंडियनकडून अरुणा बाग हिने दोन, तर पियाली रॉय, रुपाली बावरी यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. तर कर्नाटकाकडून एकमेव गोलरेखा व्ही. सी. हिने नोंदविला. दुसºया सामन्यात ‘दिल्ली सॉकर असोसिएशन’ने ‘मध्यप्रदेश फुटबॉल असोसिएशन’चा २-० असा पराभव केला. यात ‘दिल्ली सॉकर’कडून अनया गोयाम, अवेकासिंग यांनी गोलची नोंद केली.