कोल्हापूर : मुलींनी आपल्या पालकांबरोबर मुक्त संवाद साधला पाहिजे. पालकांच्या आपल्याविषयीच्या आशा-आकांक्षा, अपेक्षा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजेत. त्याचबरोबर आधुनिकतेबरोबर परंपरा, संस्कृती जोपासून आपले जीवन उज्वल करावे, असे आवाहन मधुरिमाराजे छत्रपती यांनी येथे केले.
येथील महावीर महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समितीमार्फत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शन स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका डॉ. सुषमा रोटे, तर मंगला पाटील-बडदारे, प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे प्रमुख उपस्थित होते. महिला सुरक्षितता कायदा या विषयावरील पोस्टर प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा उत्तम नमुना आहे.
स्त्री सुरक्षिततेचे बदलते आयाम या प्रदर्शनातून पहावयास मिळाले. मानवाच्या सुप्त कलांचा विकास करते ते शिक्षण. मुलींनी सर्व प्रकारचे शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे, असे आवाहन मंगला पाटील-बडदारे यांनी केले आहे. डॉ. शैलजा मंडले यांनी स्वागत केले. वेदांती पटवर्धन, प्रियांका देसाई यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शशिकला सरगर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. अश्विनी कोटणीस यांनी आभार मानले.वैचारिकता जोपासली पाहिजेव्यक्ती म्हणून निर्भयपणे जगण्याची मानसिकता मुलींमध्ये निर्माण होण्यासाठी यासारख्या उपक्रमांची मोठी मदत होते. आपल्या भोवतालचे भान ठेवून वैचारिकता जोपासली पाहिजे, असे आवाहन डॉ. सुषमा रोटे यांनी केले.