कोल्हापूर : जुलै-ऑगस्ट दरम्यान घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षेचा निकाल राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर केला.कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याचा समावेश असलेल्या कोल्हापूर विभागाचा निकाल २०.०४ टक्के इतका लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.९० टक्क्यांनी यंदा निकाल घटला आहे. यावर्षी एकूण २ हजार ३४९ मुले-मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. विभागात उत्तीर्णतेमध्ये मुलींनी बाजी मारली. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी २८.८९ इतकी असून ती मुलांपेक्षा १०.५७ टक्के इतकी अधिक आहे.या निकालाबाबतची कोल्हापूर विभागाची माहिती शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव सुरेश आवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक सचिव देवीदास कुलाल, सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले, आदी उपस्थित होते.