प्रदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जवाहरनगर सरनाईक वसाहत परिसरात मुस्लिम समाजातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या परिसरातील बहुतांशी लोकांची मातृभाषा उर्दू आहे. उर्दू माध्यमातून शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी स्थानिक लोकांच्या मदतीने महानगरपालिकेची उर्दू माध्यमाची प्राथमिक शाळा स्थापन केली. या उर्दू माध्यमातून शिक्षण घेऊन शाळेच्या दोन विद्यार्थिनी डॉक्टर व एक विद्यार्थिनी जर्मनी येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे शाळेची पटसंख्या पाचशेच्या घरात गेली आहे.सरनाईक वसाहत येथील मशिदीजवळ १९९३ साली भाड्याच्या इमारतीमध्ये शाळा सुरू झाली. त्यावेळी शाळेमध्ये फक्त २० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने दरवर्षी शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. शाळेची पटसंख्या वाढत असल्याने शिक्षण समिती, स्थानिक नगरसेवक, परिसरातील नागरिक व पालकांच्या पुढाकाराने शाळेसाठी प्रशस्त इमारत बांधण्यात आली. त्यानंतर शाळेचे नामकरण होऊन शाबाजखान अमीनखान जमादार उर्दू मराठी आणि सेमी इंग्लिश स्कूल क्र. ७० असे झाले. नव्या ठिकाणी शाळा सुरू झाल्यानंतर इमारतीसह अन्य भौतिक सुविधा शाळेला उपलब्ध झाल्या.शाळेत उर्दू माध्यमाबरोबर इंग्रजी भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन सेमी इंंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यात आले. आज उर्दू माध्यमाचे सात वर्ग व सेमी इंग्रजीचे पाच वर्ग भरत आहेत. शाळेत पाठ्यक्रमाच्या अध्यापनाबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यात येते. यावर्षी महानगरपालिका प्राथमिक शिक्षणतर्फे पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राजर्षी शाहू शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेची विद्यार्थिनी मसिरा युनूस नदाफ हिने शहरस्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आहे.शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. अभ्यासक्रमानुसार अध्यापन करणे, तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, प्रोजेक्टरद्वारे मार्गदर्शन, पालक मेळावा, साप्ताहिक युनिट टेस्ट, उर्दू भाषेसोबत मराठी व इंग्रजी विषयांचे अध्यापन व कलागुणांना प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धेत यश मिळविले आहे. शाळेतील माजी विद्यार्थिनी सायमा मुबारक बागवान ही एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेत आहे. तहुरा नियामत पटेल ही बी.डी.एस.चे शिक्षण घेत आहे, तर जर्मनी येथे आईशा वालीकर ही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे.शाळेने गुणवत्ता विकासाबरोबर शाळेचा भौगोलिक विकास करण्यासाठी स्थानिक नगरसेविका वहिदा सौदागर, फिरोज सौदागर, शिक्षकांच्या मदतीने मुलांसाठी बेंचची व्यवस्था तसेच वॉटर प्युरिफायर, शालेय साहित्य उपलब्ध करून दिले आहे.शाहू शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथममहानगरपालिकेच्यावतीने प्राथमिक शिक्षण विभागातर्फे पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राजर्षी शाहू शिष्यवृत्ती परीक्षेत मसिरा युनूस नदाफ हिने शहरात प्रथम क्रमांक पटकाविला, तर इतर पाच विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक उमर शौकत जमादार व इतर सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. शाळेच्यावतीने सकाळी ८ ते सायंकाळी सहापर्यंत जादा वर्ग घेतले जातात.स्वतंत्र संगणक लॅब, प्रवासभत्ता : शाळेत स्मार्ट टीव्ही व प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र संगणक लॅब स्थापन केली आहे. यासह शाळेमध्ये राजेंद्रनगर, लक्षतीर्थ वसाहत, गोकुळ शिरगाव येथून ७४ विद्यार्थी रोज रिक्षाने ये-जा करतात. या विद्यार्थ्यांना शासनाकडून प्रवासभत्ता दिला जातो. हा भत्ता थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होतो.
उर्दू शाळेतील मुली डॉक्टर, इंजिनिअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 12:59 AM