जयसिंगपूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जनकपिता जयसिंग महाराज यांच्या नावाने वसवलेल्या जयसिंगपूर शहराला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. शहराच्या शताब्दी वर्षानिमित्त विकासकामांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी शासनाने द्यावा, अशी मागणी नगरपालिकेचे पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर, नगराध्यक्ष सुनील पाटील-मजलेकर यांच्यासह नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नुकतीच शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नगरपरिषदेच्या शिष्टमंडळाच्यावतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जयसिंगपूर शहर आखीव व रेखीव असून व्यापारी पेठेबरोबर शैक्षणिक शहर म्हणून उदयास आली आहे. शहरालगत उपनगरांची संख्या वाढत आहे. मागील १० ते १५ वर्षांत शासनाच्या सहकार्यातून भरीव अशी विकासकामे झाली आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भाविण्यासाठी शहरांमध्ये नागरिकांना सेवा सुविधा देणे गरजेचे आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अनेक विकासकामे होणे गरजेचे आहे. यासाठी शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी मिळावा, असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी संजय पाटील-यड्रावकर यांनी मागील १५ वर्षांत झालेल्या विकासकामाची माहिती पालकमंत्री पाटील यांना दिली. मंत्री पाटील यांनी शहराला १०० वर्षे पूर्ण होत आहेत याचे औचित्य साधून शासनाकडून भरीव असा निधी देण्यासाठी आग्रही राहीन, असे शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, नगरसेवक संभाजी मोरे, प्रा. अस्लम फरास, युवराज शहा, अर्जुन देशमुख, राहुल बल्लाळ, रामदास धनवडे, अमरसिंह पाटील, शिवाजी कुंभार, गंगराम माने यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
जयसिंगपूरच्या विकासासाठी १00 कोटी द्या
By admin | Published: December 07, 2015 12:13 AM