कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यासाठी कोरोना लसींचे रोज ५० हजार डोस द्यावेत, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध कडक केले आहेत, तरी कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. एकीकडे कोल्हापूर कोरोनाचा मुकाबला करताना, दुसरीकडे कोरोनाविरोधी लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. कोल्हापूर शहरात रोज पाच हजार, तर जिल्ह्यात ४५ हजार कोरोना लसींच्या डोसची मागणी असताना केवळ २२ ते ३० हजार कोरोना लसींचे डोस उपलब्ध होत आहेत. यामुळे लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे. रोज २० ते ३० हजार लोकांना लस न घेता परतावे लागत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण सर्वांत प्रभावी उपाय आहे. त्यामुळे शहरासाठी ५ हजार, तर जिल्ह्यासाठी ४५ हजार असे ५० हजार लसींचे डोस उपलब्ध करू द्यावेत, अशी मागणी आमदार जाधव यांनी केली आहे.