कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या विमानतळ, टोल, आदी प्रश्नांबाबत आपण जागरूक असून, ते सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज, शुक्रवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाशी बोलताना दिली. खासदार धनंजय महाडिक यांनी महापौर तृप्ती माळवी यांच्यासह नगरसेवकांच्या जम्बो शिष्टमंडळाद्वारे मंत्री गडकरी यांची भेट घेऊन कोल्हापूरच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. कोल्हापूरच्या विमानतळाचा मुद्दा खासदार महाडिक यांनी उपस्थित करताच गडकरी यांनी नागरी विमानसेवा उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या पत्राची एक प्रत खासदार महाडिक यांच्याकडे दिली. विमानतळास आणखी १८ हेक्टर जागा उपलब्ध करून दिल्यास विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण होऊन तेथे मोठी विमाने उड्डाणासाठी किंवा पार्किंगसाठी येऊ शकतात.त्यामुळे राज्याच्या पातळीवर जागा उपलब्ध करून द्या, असे गडकरी यांनी सुचविले. त्यावेळी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी व राज्यपातळीवर अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल, असे महाडिक यांनी सांगितले. कोल्हापूर टोलमुक्त करा, राज्य महामार्गासाठी सीआरएफमधून निधी द्या, पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत भरीव निधी द्या, अशा मागण्या खासदार महाडिक यांनी केल्या. त्यावेळी मंत्री गडकरी यांनी ‘आयआरबी’ची निव्वळ रक्कम महानगरपालिका देऊ शकते का? त्यावरील व्याज राज्य सरकार देऊ शकते का? याबाबत चाचपणी करावी, असे सुचविले.‘केएमटी’कडे नागपूरच्या धर्तीवर बायोडिझेलवर चालणाऱ्या बसेसचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा, असे मंत्री गडकरी यांनी सुचविले. अशा बसेसमुळे इंधन खर्च कमी आणि प्रदूषणही कमी होते. तसेच या बसेस दीर्घकाळ उपयोगात राहतात, असे गडकरी यांनी सांगितले. यावेळी महापौर माळवी यांच्यासह नगरसेवक प्रा. जयंत पाटील, राजू लाटकर, कादंबरी कवाळे, ज्योत्स्ना पवार-मेढे, विनायक फाळके, प्रकाश गवंडी, प्रभाताई टिपुगडे, आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे, सरस्वती पोवार, महेश सावंत, रशीद बारगीर, प्रकाश पाटील, आदिल फरास, आदी उपस्थित होते.
विमानतळास १८ हेक्टर जागा द्या
By admin | Published: December 13, 2014 12:05 AM