कोल्हापूर : ‘गोकुळ’ सभेबाबत विरोधी गटाने केलेल्या तक्रारीतील सात मुद्द्यांंची सविस्तर चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल तत्काळ कार्यालयास पाठविण्याचे आदेश विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी सहायक निबंधक (दुग्ध) गजेंद्र देशमुख यांना दिले आहेत.‘गोकुळ’ची सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबर रोजी झाली. या सभेचे कामकाज व त्यामध्ये झालेल्या ठरावांवर विरोधी गटाने हरकत घेतली आहे. विभागीय उपनिबंधकांकडे सात मुद्दे उपस्थित करून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ‘गोकुळ’ ही संघीय संस्था असून तिचे सभासद केवळ जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्थाच होऊ शकतात, यासह सभेच्या कामकाजावर आक्षेप घेतले आहेत.
‘मल्टिस्टेट’बाबत गुप्त मतदान घेण्याची मागणी सभासदांनी करूनही संचालक मंडळाने गोंधळातच विषयपत्रिकेचे वाचन केले. याबाबत सहकार न्यायालयाने स्पष्ट आदेश देऊनही सभा गुंडाळून न्यायालयाचाही अवमान केला असून, संघाचे २००० सभासद जागेअभावी सभागृहाबाहेर उभे होते.
कोणत्याही विषयावर चर्चा न करता अवघ्या तीन मिनिटांत सभा गुंडाळण्यात आली आणि अचानक राष्ट्रगीत सुरू केल्याने अध्यक्ष, कार्यकारी संचालक, संचालक, सभासद व कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रगीताचा अवमान झाला आहे. याची गंभीर दखल घेऊन अध्यक्ष, सचिव, कार्यकारी संचालक व संचालकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्याचे आदेश द्यावेत. अशा मागण्या विरोधी गटाने विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांच्याकडे केल्या होत्या.शिरापूरकर यांनी संबधित मुद्द्यांची सखोल चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश सहायक निबंधक गजेंद्र देशमुख यांना दिले आहेत. दरम्यान, ‘गोकुळ’चे प्रशासन खोटे व बोगस इतिवृत्त सादर करण्याची शक्यता आहे.
सभेतील वस्तुस्थिती जाणून घेऊन योग्य अहवाल सादर करण्याची मागणी विरोधी गटाच्या वतीने बुधवारी सहायक निबंधक (दुग्ध) गजेंद्र देशमुख यांच्याकडे केली. यावेळी आमदार सतेज पाटील, ‘कुंभी’चे संचालक किशोर पाटील, किरणसिंह पाटील, प्रदीप पाटील-भुयेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर, बजरंग पाटील, भगवान पाटील, प्रदीप झांबरे, एकनाथ पाटील, आदी उपस्थित होते. कायद्याच्या चाकोरीत राहूनच सभेबाबतचा अहवाल देऊ, अशी ग्वाही गजेंद्र देशमुख यांनी यावेळी दिली.येलूर, बेडकीहाळ येथील सभासद करण्यास सुरुवातदूध संकलनाच्या नावाखाली येलूर, बेडकीहाळ, सोलापूर येथील कार्यकर्त्यांना संस्था स्थापन करून त्या संस्था सभासद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी ‘गोकुळ’चे १५ सुपरवायझर कार्यरत आहेत, हे संचालकांना तरी माहीत आहे काय? असे प्रदीप पाटील -भुयेकर, बाबासाहेब देवकर यांनी निदर्शनास आणून दिले.
वासाचे दूध काढाल तर याद राखा‘मल्टिस्टेट’ला विरोध करणाऱ्या संस्थांचे वासाचे दूध काढले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. हे प्रकार बंद करा, अन्यथा याद राखा. सर्व उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन जाब विचारू, असा इशारा यावेळी शिष्टमंडळाने दिला.