कोल्हापूर : ‘एमपीएससी’च्या परीक्षानंतर निवड करूनदेखील रखडलेल्या नियुक्त्या तत्काळ द्या. एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा तत्काळ भराव्यात. सर्व जागांच्या परीक्षा एमपीएससीमार्फत घ्याव्यात. परीक्षेसाठी कोणतेही पोर्टल नेमू नये, अशा विविध मागण्या महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने बुधवारी केल्या. त्याबाबतचे निवेदन या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनातील नायब तहसीलदार अनंत गुरव यांना दिले.
फेब्रुवारीमध्ये झालेल्या आरोग्य सेवक परीक्षेचा निकाल लवकर लावावा. इतर तत्सम प्रलंबित परीक्षांचे निकाल त्वरित लावावेत. पीएसआय परीक्षेत शारीरिक चाचणीबाबतचे धोरण परीक्षार्थींना विश्वासात घेऊनच ठरवावे. केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण थांबवावे. ज्या जिल्ह्यात पेपर फुटीचे प्रकरण घडले आहेत, त्याची चौकशी करावी. जिल्हा परिषद आरोग्य सेवक परिषदेची परीक्षा तत्काळ घ्यावी, आदी मागण्या या निवेदनाद्वारे केल्या आहेत. शिष्टमंडळामध्ये गिरीश फोंडे, जावेद तांबोळी, आशुतोष गावडे, सुशांत पोवार, देवराज पाटील, सुजित साबळे, आदींचा समावेश होता.