गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेतर्फे बांधण्यात येणाऱ्या सांस्कृतिक केंद्र व वाचनालयासाठी वितरीत करून परत घेण्यात आलेला ५ कोटींचा निधी परत मिळावा, अशी कळकळीची विनंती करतानाच निधी परत न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारादेखील येथील विविध संघटनांनी निवेदनातून मुख्यमंत्र्यांना मंगळवारी दिला.आठवड्यापूर्वीच राज्य शासनाने गडहिंग्लज पालिकेला ५ कोटींचा निधी दिला होता. मात्र, गडहिंग्लज कारखान्याच्या राजकारणातून तो निधी तडकाफडकी परत घेतला. त्याबद्दल निषेध नोंदविण्याबरोबरच निधी परत देण्याची मागणी विविध पक्ष-संघटनांतर्फे करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह येथील आर्किटेक्टस् अॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशन व महेश सलवादे युवा ग्रुपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन हे निवेदन दिले. शहरात नाट्यगृहाची गरज आहे. शहराची गरज आणि लोकभावना लक्षात घेऊन निधी परत द्यावा आणि गडहिंग्लजच्या सांस्कृतिक परंपरेचा सन्मान करावा, अशी मागणी ‘आर्किटेक्टस् अॅण्ड इंजिनिअर्स’नी केली आहे. शिष्टमंडळात अध्यक्ष शैलेंद्र कावणेकर, उपाध्यक्ष विरुपाक्ष पाटणे, सचिव रमेश गायकवाड यांच्यासह कृष्णात घोरपडे, संदीप पाटील, अमित मिसाळ यांचा समावेश होता. दुटप्पी राजकारण न करता नागरिकांच्या भावना विचारात घेऊन निधी परत द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळात पालिकेतील विरोधी पक्षनेते रामदास कुराडे, वाचनालय सभापती सरिता गुरव, माजी नगराध्यक्ष मंजुषा कदम, अरुणा शिंदे व लक्ष्मी घुगरे, नगरसेवक किरण कदम, हारुण सय्यद, शिक्षण मंडळ सभापती सुरेश कोळकी, आशपाक मकानदार, सुनील गुरव, राजेंद्र तारळे, आदींचा समावेश होता. राजकीय मतभेद बाजूला ठेवूनर् ंविकासनिधी परत द्यावा, अशी मागणी महेश सलवादे ग्रुपने केली आहे. शिष्टमंडळात संतोष कांबळे, मोहन बारामती, दिगंबर विटेकरी, प्रकाश कांबळे, पृथ्वीराज बारामती, अवधूत पाटील, चेतन वालीकर, शुभम बारामती, किरण म्हेत्री, संतोष सलवादे, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
गडहिंग्लज पालिकेचा निधी परत द्या
By admin | Published: April 06, 2016 12:45 AM