कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विविध क्षेत्रांतील कार्य लक्षात घेता त्यांना केंद्र शासनाच्यावतीने ‘भारतरत्न’ ही पदवी देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्यावतीने जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात समाजबांधणी, अस्पृश्यता निर्मूलन, धार्मिक आणि जातीय सलोखा, शिक्षण प्रसार, स्त्री-पुरुष समानता, सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक सलोखा, दलितोद्धार, कला, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन, वसतिगृहाद्वारे गरीब विद्यार्थ्यांची राहणे व शिक्षणाची केलेली सोय, आदी दूरदृष्टी देणारी महान कार्ये केली आहेत. त्यांचा सामाजिक समता व सलोखा हा संदेश देशभर पोहोचावा यासाठी त्यांना ‘भारतरत्न’ ही पदवी देणे आवश्यक आहे. त्यांचे हे आदर्श कार्य आजच्या युवा पिढीसमोर ठेवावे.
महाराष्टÑ शासनाने या ‘भारतरत्न’ पदवीसाठी केंद्र शासनाकडे शिफारस करावी, अशीही विनंती पाटील यांनी यावेळी केली.या पत्रकार परिषदेस प्राचार्य डॉ. आय. एच. पठाण, मराठा सेवा संघाचे राज्य सरचिटणीस दिग्विजय मोहिते, प्रा. डॉ. कविता गगराणी, प्रा. डॉ. चंद्रकांत कुरणे, वैभव घोरपडे, किरण साळुंखे, उदय पाटील, प्रमोद बोंडगे, शिवाजी घाडगे, शशिकांत नलवडे, आदी उपस्थित होते.सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठराव करावात्यांना ‘भारतरत्न’ ही पदवी मिळण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर जिल्हा परिषद, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायती, सर्व साखर कारखाने व सर्व शिक्षण संस्था, सर्व सहकारी संस्था यांनी ठराव करून महाराष्ट शासनाकडे पाठवावेत. कोल्हापूरच्या शाहूप्रेमी जनतेने यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.