लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा नगरपंचायतीवर भाजपची सत्ता द्या, वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, औद्योगिक विकासाला चालना देऊन या शहराच्या बाजारपेठेचा विकास करू, याचबरोबर पारंपरिक नागपंचमी सुरू करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. यावेळी त्यांनी निवडणुकीतील दादागिरी ठेचून काढण्यासाठी फुटा-फुटावर राज्य राखीव दल तैनात करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. येथील मरिआई चौकात भाजपच्या नगरपंचायत निवडणूक उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. खोत म्हणाले की, केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे विकास साधायचा असेल तर, येथेही भाजपची सत्ता असणे गरजेचे आहे. बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाली आहे. त्याप्रमाणे नागपंचमीला पूर्ववैभव प्राप्त करून देऊ. यावेळी आ. शिवाजीराव नाईक यांनी नागपंचमीस आम्हीस परवानगी मिळवू व आमचीच सत्ता येणार आहे. त्यामुळे यापुढे नागपंचमीचे नावही विरोधक घेणार नाहीत. आज देशात, राज्यात परिवर्तन घडले आहे, तसे परिवर्तन या शहरातही घडेल. तालुक्याचा सर्वांगीण विकास आपल्या माध्यमातून झाला आह.नागपंचमीबाबत कायदा दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरू आहे. विरोधकांनी यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे कोणती संस्कृती घ्यायची, हे आता शिराळकरांनी ठरवायचे आहे, असे रणधीर नाईक यांनी सांगितले. यावेळी इस्लामपूर नगराध्यक्ष निशिकांत पाटील, महाडिक युवाशक्तीचे सम्राट महाडिक, अॅड. नरेंद्र सूर्यवंशी, अॅड. नेहा सूर्यवंशी, सत्यजित कदम, विनायक गायकवाड, विद्याधर कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी उदयसिंगराव नाईक, रणजितसिंह नाईक, वैशाली नाईक, केदार नलवडे, सुखदेव पाटील, दिलीप कदम, बंडा डांगे, नंदाताई कदम, सारिका पाटील आदी उपस्थित होते. आमच्याकडेच यावे लागेल पंधरा वर्षांत विरोधकांनी नागपंचमीबाबत काहीही केले नाही. आता विरोधकांची सत्ता नसल्याने नागपंचमीच काय, कोणताही प्रश्न असला तरी, त्यासाठी आमच्याकडेच यावे लागेल, असे खोत यांनी सांगितले.
भाजपला सत्ता द्या, विकास घडवू
By admin | Published: May 21, 2017 12:52 AM