लोकमत न्यूज नेटवर्क
बुबनाळ : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार असल्याने त्या जागी आलास जिल्हा परिषद मतदार संघातील सदस्य परवीन दादेपाशा पटेल यांची नियुक्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह मतदारांमधून होत आहे. याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी परवीन पटेल यांची शिफारस केल्याने शिरोळ तालुक्याला अध्यक्षपदाची संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेचा कार्यकाल संपण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणत्याही क्षणी पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. याबाबत पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या फाॅर्म्युल्यानुसार अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे व उपाध्यक्षपद काँग्रेसला मिळणार आहे. अध्यक्षपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने राष्ट्रवादीकडून परवीन पटेल, युवराज पाटील, जयवंतराव शिंपी, विजय बोरगे यांच्या नावाची चर्चा आहे.
आलास जिल्हा परिषद मतदार संघातील परवीन पटेल यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संधी द्यावी, अशी मागणी शिरोळ तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह मतदार संघातून होत आहे. याबाबत आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे पटेल यांची निवड होऊन तालुक्याला अध्यक्षपद मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
------------------------
चौकट - यंदा संधी मिळणार का!
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी मित्रपक्षांची सत्ता असली तरी अध्यक्ष, उपाध्यक्ष, समिती निवडीवेळी कायम कागल असो की कोल्हापूर परिसरात असणाऱ्या मतदार संघातील कार्यकर्त्याला संधी दिली जाते. यंदा तर कागल, करवीरच्या बाहेर संधी मिळणार का, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
फोटो - २७०६२०२१-जेएवाय-०१-परवीन पटेल