इचलकरंजी : कोरोना महामारीच्या काळात कोविड केअर सेंटरसाठी पालिकेने विविध शाळा व इमारती ताब्यात घेतल्या होत्या. त्यांना घरफाळा व पाणीपट्टीमध्ये सवलत देणे आवश्यक आहे. त्यासाठी हा विषय पालिका सभेत घेण्याची मागणी राजर्षी शाहू आघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे यांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्याकडे केली आहे.
इचलकरंजीत गेल्या वर्षी कोरोना संसर्ग वाढल्याने पालिकेने शहरातील विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी शाळा, संस्थांच्या इमारती ताब्यात घेतल्या होत्या. त्यासाठी तेथील वीज वापरली होती आणि त्या ठिकाणच्या काही वास्तूंचे नुकसानही झाले आहे. त्याची भरपाई मागणी केली जात असताना पालिकेकडून दाद दिली जात नाही. तसेच घरफाळा व पाणीपट्टीचा तगादा लावला आहे. प्रसंगी त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. वास्तविक राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी या संस्थांनी मोठी मदत केली आहे. त्यांना उत्तरदायित्वाच्या भावनेतून सहकार्य करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास भविष्यात अशा संस्था पालिकेला मदत करणार नाहीत. त्यामुळे संबंधित इमारतींची नुकसानभरपाई द्यावी व घरफाळा, पाणीपट्टीत सवलत देण्याबाबत पालिका सभेत निर्णय घ्यावा, अशी मागणी चोपडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.