आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ४ : ऊसाचे उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पहिल्या हप्तयातून पीक कर्जाची कशीबशी परतफेड झाली, पण पुढील खर्चासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी किमान पाचशे रूपये दुसरी उचल द्यावी, अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
पाणी टंचाई आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा ऊसाचे उत्पादनात निम्याहून अधिक घट झाली. ऊसाचार एकरी उतारा घटल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. हंगाम सुरू करताना ठरलेल्या फार्मुल्यानुसार एफआरपी व १७५ रूपये कारखान्यांनी दिले. पण कायद्याने उत्पन्नातील ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. गेले सहा-सात महिन्यातील साखरेचा खुल्या बाजारातील भाव पाहता कारखान्यांना चांगले पैसे मिळत आहेत.
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना किमान पाचशे रूपये प्रतिटन दुसरी उचल द्यावी. अशी मागणी ‘अंकुश’ ने केली आहे. साखर कारखानदारांना जाग आणण्यासाठी सोमवारी (दि. १०) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात एक दिवसाचा ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश जगदाळे, सुरेश भोसले, अविनाश पाटील आदींनी दिला आहे.