जोतिबा डोंगरावरील जोतिबाचे देऊळ मार्च २०२० पासून लॉकडाऊनमुळे बंद आहे. येथे संपूर्ण पूजारी वर्ग हा पारंपरिक कुलाचार विधीवर अवलंबून आहे. जोतिबा डोंगरावर ५ हजार ७०६ लोकांचे वास्तव असून ९६० कुटूंबे आहेत. उदरनिर्वाहाचे एकमेव साधन हे मंदिर आहे. हेच मंदिर गेले पंधरा महिने बंद असल्याने पूजारी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. मार्च २०२० पासून चैत्र पौर्णिमेच्या दोन मुख्य यात्रा, एक श्रावण षष्ठी, नवरात्रोत्सव, दीपावली, १२ पौर्णिमा, पाच रविवार खेटे यात्रा या भाविकाविना पार पडल्या. वर्षाकाठी ७० ते ८० लाख येणारे भाविक जोतिबा डोंगरावर आलेच नाहीत. जोतिबा मंदिर, पुजारी आणि भाविक यांच्यातील गेले दीड वर्षे फिजिकल डिंस्टसिंग वाढतच गेल्यामुळे पुजारी आर्थिकदृष्टया लॉकडाऊन झाला. व्यापारी पेठेला टाळेबंदी लागली. लॉकडाऊनमुळे येथील अर्थव्यवस्थाच कोलमडून पडली. हातावरचे पोट असणाऱ्यांचे मोठे हाल झाले. लॉकडाऊन उठेल या आशेवर असणाऱ्या व्यापारी वर्गाचा तर अपेक्षाभंग झाला. कर्जाचे हप्ते तटले. दुकान, गाळे भाड्यांचा भुर्दंड सोसावा लागल. भरलेल्या मालाची नासाडी झाली. येथील प्रत्येक कुटुंबाला आर्थिक पॅकेजची गरज़ आहे. शासनाकडून इतर घटकांना आर्थिक पॅकेज दिले . वंचित राहलेल्या पूजारी समाजाला ही पॅकेज द्यावे. वीज बिल, घरफाळा, पाणीपट्टी, कर्जमाफी करण्याची मागणी होत आहे. तमिळनाडू सरकारने मंदिरातील पूजारीसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. महाराष्ट्र शासनाने ही येथील पुजाऱ्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करून पुजाऱ्यांना आर्थिक लॉकडाऊनमधून अनलॉक करण्याची मागणी होत आहे.
फोटो आहे : कॅप्सन १) दख्खनचा राजा श्री जोतिबाचे मंदिर हाच एक आधार असलेले जोतिबा डोंगराचे गाव.